...

Pune Rain News : अवकाळी पावसाचा कहर; पुण्यात महिलेचा जीव गेला, रस्ते झाले नदीसारखे

 

पुणे : शहरात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने कहर माजवला असून विजांचा कडकडाट, सुसाट वारे आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुरुवारी दुपारी सुरू झालेल्या पावसाने सायंकाळपर्यंत शहर अक्षरशः ठप्प केले. या पावसात पु. ल. देशपांडे उद्यानाजवळील नवश्या मारुती परिसरात झाड टपरीवर कोसळल्याने एका फुल विक्रेत्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (pune heavy rain waterlogging tree fall woman death traffic update)

 

जोरदार पावसामुळे पुण्यातील प्रमुख रस्त्यांसह अनेक भागांना नद्यांचे स्वरूप आले. कार्यालय सुटण्याच्या वेळेत पाऊस झाल्याने वाहतूक कोंडी झाली. अनेक ठिकाणी वाहने पाण्यात अडकली, काही बंद पडली तर काही रस्त्यांवर चार ते पाच फूट पाणी साचल्याने वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली. केडगावनगर, सिंहगड रोड, बाणेर, विश्रांतवाडी, स्वारगेट, कोथरूड, धायरी, वाकड, हडपसर, वारजे आदी भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान, अग्निशमन दल, पुणे पोलिस आणि महापालिका प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्त्यांवरील झाडे हटवणे, पाणी उपसा करणे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले.

 

 

वीजपुरवठ्यावर परिणाम

पावसामुळे अतिउच्चदाब (EHV) आणि उच्चदाब वाहिन्यांमध्ये बिघाड (ट्रिपिंग) झाल्याने शिवाजीनगर, पर्वती, बंडगार्डन, रास्तापेठ, कोथरूड या भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.

 

सोसायट्यांमध्येही पाणी शिरले

वारजे, रविवार पेठ, सैलसबरी पार्क, पाटील प्लाझा परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी अग्निशमन दलाकडे प्राप्त झाल्या.

 

झाडपडीच्या ८२ घटना

मुसळधार पावसात शहरात तब्बल ८२ झाडपडीच्या घटना घडल्या. वानवडी, बाणेर, औंध, सिंहगड रोड, ताडीवाला रोड, कोरेगाव पार्कसह २१ भागांमध्ये झाडे कोसळली. यापैकी ५२ ठिकाणांवरील झाडे हटवण्यात प्रशासनाला यश आले आहे.


वादळामुळे छत उडाले

कोंढवे धावडे येथील भीमनगर परिसरात एका इमारतीच्या टेरेसवरील लोखंडी पत्र्याचे छत वाऱ्यामुळे उडून रस्त्यावर पडले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

प्रशासन सतर्क ; नाला सफाई अभियान सुरू करणार

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील जलभराव रोखण्यासाठी सोमवारपासून नाला सफाई अभियान सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या शहराची ड्रेनेज क्षमता 50-60 मिमी पावसापुरती असून ती 130 मिमीपर्यंत वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुरुवारीच्या पावसात शहरातील तब्बल 260 ठिकाणी पाणी साचल्याचे समोर आले असून, यावर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

Local ad 1