UPSC Success : ग्रामीण भागातून UPSC जिंकली ! कौठा गावच्या ऋषिकेश पालीमकर यांना ऑल इंडिया २८३ वा रँक
upsc success rishikesh palimkar upsc rank 283 nanded kandhar
UPSC Success नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कौठा गावातील ऋषिकेश रामकिशन पालीमकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत ऑल इंडिया २८३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून येऊन जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण गाव आणि जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. (upsc success rishikesh palimkar upsc rank 283 nanded kandhar)
ऋषिकेश पालीमकर हे लहानपणापासूनच अभ्यासू, कुशाग्र बुद्धिमत्तेचे आणि मेहनती विद्यार्थी म्हणून ओळखले जातात. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत गुणवत्तेच्या जोरावर यश संपादन केले. UPSC सारख्या देशातील अत्यंत कठीण परीक्षेत त्यांनी दुसऱ्याच प्रयत्नात ऑल इंडिया २८३ वा रँक मिळवत मोठी कामगिरी केली आहे.
ऋषिकेश यांचे मूळ गाव कौठा (ता. कंधार) असून त्यांचे प्राथमिक शिक्षण गुरुदेव विद्या मंदिर, मुखेड येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर (नांदेड) येथे पूर्ण केले. पुढे उच्च माध्यमिक शिक्षण गोविंदराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, चिखली (ता. कंधार) येथे घेतले. अभियांत्रिकी शिक्षणासाठी त्यांनी तेलंगणातील एनआयटी, वरंगल येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली.
Pune Municipal Budget 2026-27 | पुणे महापालिका बजेट 2026-27 : उत्पन्न वाढीसाठी ठोस उपाय नाहीत
ऋषिकेश यांचे वडील प्रा. रामकिशन पालीमकर हे गोविंदराव पाटील ज्युनियर कॉलेज, चिखली येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, तर आई प्राथमिक शिक्षिका आहेत. मुलगा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्यामुळे पालकांनी त्याला शिक्षणासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षेतही त्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळवले होते.
UPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी ऋषिकेश मागील दोन वर्षांपासून दिल्ली येथे अभ्यास करत होते. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत आणि दृढ निश्चयाच्या बळावर त्यांनी दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळवले. ऋषिकेश पालीमकर यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या यशामुळे नांदेड जिल्ह्याचे नाव देशभरात उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

