...

Nanded ACB Trap: अर्जित रजा मंजुरीसाठी 3 हजारांची लाच घेताना केंद्रप्रमुख रंगेहात अटक

 

नांदेड : अर्जित रजा मंजूर करून देण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना केंद्रप्रमुख दिगंबर रामचंद्र शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी (दि. 16 फेब्रुवारी 2026) पंचायत समिती, लोहा कार्यालयात करण्यात आली.

 

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड (ला.प्र.वि.) कडे 55 वर्षीय प्राथमिक शिक्षकाने 12 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. तक्रारदार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भाद्रा (ता. लोहा) येथे कार्यरत असून त्यांनी 46 दिवसांची अर्जित रजा मंजुरीसाठी 9 फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता.

 

तक्रारीनुसार, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती लोहा येथे आस्थापना विभागाचे काम पाहणारे केंद्रप्रमुख दिगंबर शिंदे यांनी रजा मंजूर करण्यासाठी स्वतःसाठी तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्या नावाने 4 हजार रुपयांची मागणी केली होती. पडताळणीदरम्यान शिंदे यांनी तक्रारदाराकडे 3 हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

 

यानंतर 16 फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने 3 हजार रुपये दिल्यानंतर शिंदे यांनी ती रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले. अंगझडतीत आरोपीकडून एक मोबाईल हॅन्डसेट व 2,700 रुपये रोख रक्कम मिळून आली. मोबाईल तपासणीची प्रक्रिया सुरू असून घरझडतीची कार्यवाहीही करण्यात येत आहे.

 

या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांनी पर्यवेक्षण केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अर्चना करपुडे करत आहेत.

 

 

Local ad 1