...

भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक

गंभीर जखमी ; चालकावर गुन्हा दाखल

 

पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरातील आरटीओ चौक परिसरात असलेल्या सीएनजी पंपासमोर घडलेल्या अपघातात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आई यास्मीन पूनावाला (वय ७५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायाला आणि पाठीला फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या प्रकरणी कारचालक हेमंत रविंद्र चांदगुडे (वय ४०, रा. चंदननगर) याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (pune accident shahzad poonawalla mother injured rto cng pump)

 

घटना नेमकी कशी घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यास्मीन पूनावाला या नातेवाईकांसह कारने पुण्यात आल्या होत्या. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांची कार आरटीओ परिसरातील सीएनजी पंपावर इंधन भरण्यासाठी थांबली. चालक सीएनजी भरण्यास गेला असताना त्या वाहनाबाहेर उभ्या होत्या. याच वेळी हेमंत चांदगुडे हे देखील त्या पंपावर आले होते. त्यांनी कार निष्काळजीपणे रिव्हर्स घेताना यास्मीन पूनावाला यांना धडक दिल्याचा आरोप आहे. धडकेमुळे त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर चालकाने जखमी महिलेला रुग्णालयात न नेता घटनास्थळावरून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. उपस्थित नागरिक व त्यांच्या चालकाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

 

 

मालमत्ता कर थकवणाऱ्यांना पुणे महापालिकेचा दणका ! ५८ ठिकाणी जप्ती कारवाई

 

 

पोलिस तपास सुरू

शहजाद पूनावाला यांचे व्यवस्थापक केविन प्रफुल्ल वजीर (वय ३८) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे घटनेचा तपास केला जात आहे. पोलिसांकडून कारचालकाचा शोध घेतला जात आहे.

 

 

महापौर निवडणुकीत ट्विस्ट ! भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिरंगी लढत !

 

 

शहजाद पूनावाला यांची सोशल मीडिया पोस्ट

शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले आहे की, “एका व्यक्तीने माझ्या आईवर कार चालवली आणि नंतर तो फरार झाला. त्या अत्यंत दयाळू स्वभावाच्या आहेत. या वयात त्यांच्यासोबत असे घडणे वेदनादायक आहे.” त्यांनी पुणे पोलिस व महाराष्ट्र सरकारकडे आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी त्यांच्या आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तहसीन पूनावाला यांनीही प्रतिक्रिया देत, जखमी महिला ज्येष्ठ नागरिक असून इंधन भरताना वाहनाबाहेर उभ्या असताना धडक दिल्याचे म्हटले आहे.

 

Local ad 1