पुणे, राज्यात सध्या अनेक भागांत अंशतः ढगाळ हवामानाची स्थिती असून ही परिस्थिती संपूर्ण आठवडाभर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः राज्याच्या दक्षिण भागांमध्ये दुपारनंतर स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये हा पाऊस प्रामुख्याने दिसून येऊ शकतो. (maharashtra weather update storm rain alert march 30-31- 2026)
दरम्यान, दि. ३० आणि ३१ मार्च २०२६ रोजी राज्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळी वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात या बदलांचा अधिक प्रभाव जाणवू शकतो. उर्वरित विदर्भातही हवामानात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुणे महापालिका अर्थसंकल्प २०२६-२७ : १२ तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर बजेट मंजुर
रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा योग्य प्रकारे झाकून ठेवावीत. तसेच संभाव्य वादळी वारे, पाऊस आणि गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

