पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात औंध–बोपोडी परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक ८ मधील भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी प्रचारादरम्यान कस्तुरबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. लोकांच्या भावना लक्षात घेऊनच या भागांचा विकास केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
औंध परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान सनी निम्हण यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाबाबतच्या अपेक्षा जाणून घेतल्या. कस्तुरबा वसाहत, जगदिश नगर, कांबळे वस्ती, संजय गांधी वस्ती आणि स्पायसर वस्ती या भागात ही पदयात्रा पार पडली.
यावेळी बोलताना निम्हण म्हणाले की, झोपडपट्टी भागांमध्ये एसआरए (Slum Rehabilitation Authority) योजना राबवायची की नाही, याचा निर्णय स्थानिक नागरिकांनीच घ्यायला हवा. भाजपचा विकासाचा दृष्टिकोन लोकांच्या सहभागावर आधारित असून, कोणताही प्रकल्प जबरदस्तीने लादला जाणार नाही. नागरिकांच्या भावना आणि गरजा समजून घेऊनच सुधारणा आणि मूलभूत सोयी-सुविधा दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
या प्रचारावेळी भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे इतर उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड तसेच दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. स्थानिक पातळीवर संवाद साधत विकासाचा आराखडा मांडल्यामुळे सनी निम्हण यांच्या प्रचाराला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

