पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे अधिकृत उमेदवार सनी विनायक निम्हण यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, त्यांच्या वतीने बोपोडी परिसरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या पदयात्रेत प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
सकाळच्या सत्रात औंध येथील सानेवाडी आय.टी.आय. रोड परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. तर सायंकाळी बोपोडीतील मानाजी बाग, भोईटे वस्ती परिसरात प्रचार करण्यात आला. या दरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, वाहतूक, स्वच्छता आणि नागरी समस्या यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत आपल्या समस्या, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. स्थानिक प्रश्नांवर सकारात्मक आणि ठोस उपाययोजनांचे आश्वासन देत सनी निम्हण यांनी “लोकसहभागातून विकास” हे आपले ध्येय असल्याचे सांगितले. या पदयात्रे मुळे परिसरातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.

