पुणे | प्रतिनिधी
शहराच्या विकासाबाबत भाजपकडे नागरिकांना सांगण्यासारखे काहीही उरलेले नाही. देशातील शंभर स्मार्ट सिटी प्रकल्प आज दुर्बिण लावूनही दिसत नाहीत. भाजपचे नेते विकासाऐवजी इमारतींच्या पुनर्विकासातील ‘टक्केवारी’ आणि जमिनीच्या व्यवहारातच गुंतले आहेत, असा जोरदार हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. (harshvardhan sapkal bjp criticism pune election 2026)
प्रभाग क्रमांक २१ मधील महर्षीनगर, मुकुंदनगर, सॅलिसबरी पार्क व लुल्लानगर भागातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी मुकुंदनगर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार अक्षय अनिलकुमार जैन, योगिता भरत सुराणा, डॉ. स्नेहलता पाडळे आणि पुष्कर प्रसाद आबनावेउपस्थित होते.
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना सपकाळ म्हणाले की, “मी मारायचे सोंग करतो आणि तू रडायचे सोंग कर” अशी नूरा कुस्ती दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे. हे दोन्ही पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सत्ता असताना एकत्र मलिदा वाटून घेतात आणि निवडणुकीत एकमेकांवर टीका करून जनतेची दिशाभूल करतात.
पुण्यात कोयता गँगसारख्या गुंडांना अप्रत्यक्ष पाठबळ, जमिनी बळकावण्याचे प्रकार आणि भ्रष्टाचाराचे आरोप वाढले असल्याचा दावा करत त्यांनी महायुतीवर टीकेची झोड उठवली. “पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पुतण्याला सत्तेत घेऊन भाजप त्याच्यावरच टीका करतो. जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्र्याच्या मुलाला वाचवण्यात आले,” असा आरोपही त्यांनी केला. ‘लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देऊन मतं विकत घेण्याचा प्रकार सुरू आहे. हा देवा भाऊ नसून मेवा भाऊ आहे,’ असा टोला लगावत त्यांनी सरकारवर टीका केली.
पुणे शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, कायदा व सुव्यवस्था हे खरे मुद्दे बाजूला ठेवून जाती-धर्मांवर निवडणूक लढवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. “काँग्रेस सर्व समाजाला सोबत घेऊन विकास करणारी विचारधारा आहे. पुणेकरांनी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देऊन सत्ताधाऱ्यांना धडा शिकवावा,” असे आवाहन सपकाळ यांनी केले.
❓ FAQ (प्रश्न – उत्तर)
Q1. हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर काय आरोप केले?
भाजपचे नेते विकासाऐवजी इमारत पुनर्विकासातील टक्केवारी, जमिनीचे व्यवहार आणि भ्रष्टाचारात गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केला.
Q2. ही सभा कुठे आणि कशासाठी झाली?
मुकुंदनगर येथे प्रभाग क्रमांक २१ मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा झाली.
Q3. कोणते उमेदवार या सभेत होते?
अक्षय अनिलकुमार जैन, योगिता भरत सुराणा, डॉ. स्नेहलता पाडळे आणि पुष्कर प्रसाद आबनावे उपस्थित होते.
Q4. पुण्यातील प्रमुख मुद्द्यांवर सपकाळ काय म्हणाले?
पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्था हे खरे मुद्दे असून सत्ताधारी ते सोडून जाती-धर्मांवर निवडणूक लढवत असल्याची टीका त्यांनी केली.
Q5. काँग्रेसने पुणेकरांना काय आवाहन केले?
काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देऊन विकास, सुशासन आणि चांगल्या नागरी जीवनासाठी साथ देण्याचे आवाहन करण्यात आले.

