पुणे : प्रभाग क्रमांक २५ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी मोठ्या उत्साहात पदयात्रा काढण्यात आली. आमदार हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पदयात्रेला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो पुणेकरांनी रस्त्यावर उतरून राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. (raghavendra bappu mankar bjp padyatra pune ward 25)
प्रभाग २५ मधील अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर, स्वरदा गौरव बापट, कुणाल शैलेश टिळक आणि स्वप्नाली नितीन पंडित यांच्या प्रचारार्थ ही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी ५ वाजता पंताचा गोट येथून पदयात्रेला सुरुवात झाली.
‘प्रभाग २५ मधील पुणेकरांचा निर्धार, निवडून येणार भाजपचेच उमेदवार, पुण्याची शान, भाजपचा मान; प्रभाग २५ चा वाढवू सन्मान, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कुमठेकर रस्ता, चित्रशाळा चौक, फडतरे चौक येथे पोहोचताच कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. पेरुगेट, पावन मारुती आणि लिमयेवाडी परिसरात स्थानिक रहिवाशांनी घरांच्या बाल्कनीतून उमेदवारांवर पुष्पवृष्टी केली. ठिकठिकाणी औक्षण करून उमेदवारांचे स्वागत करण्यात आले.
नवजवान चौक, नागनाथपार, गायआळी आणि निंबाळकर तालीम परिसरात मतदारांशी थेट संवाद साधत उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. खजिना विहीर, स्वामी समर्थ मंदिर, माडीवाले कॉलनीमार्गे बाजीराव रस्त्यावरील भिकारदास मारुती मंदिर येथे दर्शन घेऊन विजयाचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर महाराणा प्रताप उद्यान येथे पदयात्रेचा समारोप झाला.
यावेळी भाजपच्या चारही उमेदवारांनी तत्पर लोकसेवेच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. अनेक गणेश मंडळांकडून उमेदवारांचे स्वागत करण्यात आले.
या पदयात्रेत माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, शहर पदाधिकारी प्रणव गंजीवाले, महिला आघाडीच्या मोहना गद्रे, रुपाली कदम, सुरेखाताई पाषाणकर, उज्वलाताई पावटेकर, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चाचे श्रेयस लेले यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, बुथप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

