पुणे : राजकारणात घराणेशाहीवर कितीही टीका होत असली तरी पुणे जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांनी स्थानिक पातळीवर मतदारांचा राजकीय घराण्यांवरील विश्वास अजूनही कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यमान आणि माजी आमदारांच्या मुला-मुली, पत्नी तसेच जवळच्या नातेवाईकांना मतदारांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत विजयी केले. त्यामुळे राजकीय वारशाची पुढची पिढी अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून आले आहे. (pune zp election political dynasty winners)
MHADA Pune Lottery : घर लागलं नाही? काळजी नको ; MHADA पुण्याची नवी सोडत येतेय
या निवडणुकांत अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या कुटुंबीयांना मैदानात उतरवले होते आणि त्यापैकी बहुतांश उमेदवारांनी विजय मिळवला. स्थानिक राजकारणात ओळख, कुटुंबीयांचे जाळे आणि पूर्वीपासूनचा राजकीय प्रभाव हे अजूनही निर्णायक घटक ठरत असल्याचे निकालावरून दिसते.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या व ठाकरे कुटुंबाची सून अंकिता पाटील-ठाकरे या सलग दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. इंदापूर तालुक्यातील बावडा गटातून त्या जिल्हा परिषदेसाठी उमेदवार होत्या. मागीलप्रमाणे यंदाही मतदारांनी त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला. अंकिता पाटील-ठाकरे यांचा विवाह शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू बिंदुमाधव ठाकरे यांचे सुपुत्र निहार ठाकरे यांच्याशी झाला आहे.
वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांच्या दोन्ही कन्या निवडणुकीत यशस्वी ठरल्या. दीपाली गव्हाणे यांनी शिरूर भागातून, तर रूपाली झेंडे यांनी पुरंदर तालुक्यातून विजय मिळवला. माजी आमदार विलास लांडे यांची कन्या विनया मुंगसे खेड तालुक्यातून विजयी झाल्या. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवत इंदापूर तालुक्यातील बोरी पंचायत समिती गटातून उल्लेखनीय मतांनी विजय मिळवला.
शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र राजेंद्र गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातून विजय मिळवला. त्याचप्रमाणे माजी आमदार रमेश थोरात यांचे सुपुत्र तुषार थोरात आणि माजी आमदार काशीनाथ खुटवड यांचे सुपुत्र विक्रम खुटवड यांचाही विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे.
भोर भागात काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे पंचायत समिती निवडणुकीत विजयी झाल्या. विशेष म्हणजे, संग्राम थोपटे यांनी नुकताच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी आमदार अशोक पवा* यांच्या पत्नी सुजाता पवार यांनी शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गटातून विजय मिळवला.
तथापि, सर्वच ठिकाणी घराणेशाही यशस्वी ठरली असे नाही. दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे यांना पराभवाचा सामना करावा लागला. खेड–आळंदी भागातील शिवसेना (ठाकरे गट)चे आमदार बाबाजी काळे यांचा प्रभाव कायम असला तरी त्यांच्या बहिणीला पाईट–आंबेठाण गटातून पराभव पत्करावा लागला. दरम्यान, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील आंबेगाव तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. एकंदरीत, या निकालांनी स्थानिक राजकारणात कुटुंबीय ओळख आणि राजकीय वारसा हे अजूनही मोठे राजकीय भांडवल ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे.

