Pune News | कौशल्य प्रशिक्षणामुळे युवक आत्मनिर्भर बनतील ; बार्टीकडून १८० प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण

पुणे : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवीच्या आधारे रोजगार मिळविणे अधिक कठीण होत असून, युवकांनी कौशल्याधारित शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. कौशल्य विकासामुळे रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध होत असून, त्यातून युवक आत्मनिर्भर बनू शकतात, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्या कौशल्य विकास विभागाचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी केले.

 

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त बार्टी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क (एसटीपी) यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालय परिसरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशनच्या सी-थ्री-आय (CIII) केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी अनुसूचित जातीतील १८० युवक-युवतींना आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे आयोजन बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अध्यक्षस्थानी एस. एम. जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एकनाथ मुंढे होते. यावेळी बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक महेश गवई , लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुंदन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

डॉ. जोगदंड यांनी सांगितले की, उद्योगांच्या बदलत्या गरजेनुसार आधुनिक कौशल्ये आत्मसात करणारे युवक भविष्यात अधिक स्पर्धात्मक ठरतील. त्यामुळे कौशल्य विकासाला शिक्षणाइतकेच महत्त्व देण्याची गरज आहे.

या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या युवक-युवतींना ग्राफिक डिझाइन, सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह, आयटी हेल्प डेस्क असिस्टंट, डेस्कटॉप पब्लिशिंग, ड्रोन सर्व्हिस टेक्निशियन आणि इलेक्ट्रिक वाहन देखभाल तंत्रज्ञ अशा रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे डिजिटल अर्थव्यवस्था, माहिती तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच प्रशिक्षणानंतर रोजगार मिळविलेल्या आणि स्वयंरोजगारात यशस्वी ठरलेल्या उमेदवारांनी आपले अनुभव मांडत कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.

बार्टीच्या या उपक्रमामुळे अनुसूचित जातीतील युवक-युवतींच्या रोजगारक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार असून, आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

 

 

 

Local ad 1