Pune Patal Lok Project | आधी नकार, आता 34 हजार कोटींच्या ‘पाताल लोक’साठी महापालिका तयार !

देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर PMRDA ने तयार केला प्राथमिक आराखडा

 

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘पाताल लोक’ अर्थात भुयारी मार्गांचे जाळे उभारण्याची घोषणा केली होती. त्यावेळ या पाताल लोकची मोठी चर्चा झाली. राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला हा प्रकल्प राबवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, सुरुवातीला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणे पुणे महापालिकेसाठी शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला महापालिकेने अप्रत्यक्षपणे नकार दिल्याची चर्चा रंगली होती. (pune patal lok project pmc u turn on 54 km tunnel network plan)

 

 

Pune School News : पुण्यातील 13 अनधिकृत शाळांची यादी जाहीर ; पालकांना प्रवेश न घेण्याचे आवाहन

 

 

दरम्यान, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ने पुढाकार घेत शहरातील 54 किलोमीटर लांबीच्या पाच भुयारी मार्गांचा प्राथमिक आराखडा तयार केला. यानंतर आता पुणे महापालिकेनेही या प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका घेत तयारी सुरू केली आहे.

 

 

Pune Police Dismissed : खंडणी प्रकरणात पोलिस अधिकारी आणि रिल्स स्टार महिला अंमलदारसह तिघे बडतर्फ

 

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी ‘विशेष उद्देश वाहन (SPV)’ स्थापन करण्यात येणार आहे. या SPV मध्ये पुणे महापालिका, PMRDA आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी असतील. तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जागतिक दर्जाच्या सल्लागाराची नियुक्ती करण्याचाही विचार सुरू आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 34 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेचे A+ क्रेडिट रेटिंग असल्यामुळे जागतिक बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडून निधी उभारणी करणे सोपे होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.

 

‘टनल नेटवर्क – पाताल लोक’ प्रकल्पातील प्रस्तावित प्रमुख मार्ग
* येरवडा/शास्त्रीनगर ते खडी मशीन चौक (कोंढवा) उत्तर-दक्षिण कॉरिडॉर
* सिंहगड रस्ता ते जगताप डेअरी (औंध/वाकड) समांतर मार्ग
* खडकी ते शास्त्रीनगर पूर्व-पश्चिम संपर्क मार्ग
* सेव्हन लव्हज चौक ते सिंहगड रोड मिश्र एलिव्हेटेड व भूमिगत मार्ग
* हिंजवडी-जगताप डेअरी-कोथरूड-पाषाण IT कनेक्टिव्हिटी मार्ग

 

प्रशासनाच्या मते, हे टनल नेटवर्क कार्यान्वित झाल्यानंतर जवळपास 7 लाख वाहने थेट या मार्गांचा वापर करू शकतील. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहनांचा ताण कमी होऊन ट्रॅफिक जाममध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. सध्या बंगळुरूमध्ये 22 किमी लांबीच्या भुयारी मार्गाचे काम सुरू असून, पुणे हा अशा प्रकारचा मोठा प्रकल्प राबवणारे देशातील दुसरे शहर ठरू शकते.

 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) प्रस्तावित केलेला येरवडा ते कात्रज दरम्यानचा बोगदा व्यवहार्य नसल्याची भूमिका यापूर्वी पुणे महापालिका प्रशासनाने घेतली होती. “येरवडा ते कात्रजदरम्यानचा बोगदा तांत्रिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. बोगद्याची उपयुक्तता तसेच अपेक्षित खर्चही व्यवहार्य नसल्याने या प्रकल्पाला आमचा विरोध आहे,” असे महापालिकेकडून यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता प्रशासनाची भूमिका बदललेली दिसत आहे. याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना विचारले असता ते म्हणाले, “PMRDA ने तयार केलेल्या प्राथमिक आराखड्यात काही त्रुटी होत्या. त्यानंतर सखोल अभ्यास करून सुधारित प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याचे सादरीकरणही करण्यात आले असून, त्यानंतर पुण्यात ‘पाताल लोक’ प्रकल्प राबवणे शक्य असल्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत,”असे स्पष्ट केले आहे.

 

 

Local ad 1