Pune School News पुणे : आगामी शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी पालकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. शहरातील विनाअनुमती सुरू असलेल्या 13 अनधिकृत शाळांची यादी महापालिकेने जाहीर केली असून, या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
Pune Police Dismissed : खंडणी प्रकरणात पोलिस अधिकारी आणि रिल्स स्टार महिला अंमलदारसह तिघे बडतर्फ
महापालिकेने केलेल्या तपासणीत शहरातील 13 शाळा आवश्यक शासकीय परवानगी आणि मान्यता नसताना सुरू असल्याचे आढळून आले. शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होऊ शकतो. संबंधित शाळांकडे वैध शैक्षणिक मान्यतापत्र नसल्याने पुढील वर्गप्रवेश, शैक्षणिक नोंदी आणि प्रमाणपत्रांबाबत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
महापालिकेने जाहीर केलेल्या यादीत बिबवेवाडी, येरवडा, कोंढवा, हडपसर, लोहगाव, उंड्री आणि आंबेगाव परिसरातील शाळांचा समावेश आहे. यामध्ये न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल, महात्मा गांधी प्रशाला, टीम्स तकवा इस्लामिक स्कूल अँड मक्तब, सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल, इमॅन्युअल पब्लिक स्कूल, आकांक्षा अॅकॅडमी स्कूल, आर्यन पब्लिक स्कूल, लेगसी हायस्कूल, शिबली नोमानी इंग्लिश मिडीयम स्कूल, ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूल, इकरा इस्लामिक स्कूल, ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि आर्यन वर्ल्ड स्कूल यांचा समावेश आहे.

महापालिकेने पालकांना मुलांचा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची शासकीय मान्यता तपासण्याचे आवाहन केले आहे. तसेच शहरात अन्य अनधिकृत शाळांची माहिती मिळाल्यास ती शिक्षण विभागाला कळवावी, असेही सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि भवितव्य लक्षात घेता पालकांनी अधिक जागरूक राहणे आवश्यक असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे.

