Pune Police Dismissed : खंडणी प्रकरणात पोलिस अधिकारी आणि रिल्स स्टार महिला अंमलदारसह तिघे बडतर्फ

Pune Police Dismissed पुणे, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्यासह रिल्स स्टार म्हणून चर्चेत असलेल्या महिला पोलिस अंमलदार आणि आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

 

बडतर्फ करण्यात आलेल्यांमध्ये पोलिस उपनिरीक्षक अजित त्रंबक बडे (वय ३८), पोलिस अंमलदार सुदाम बाळकृष्ण तायडे (वय ३५) आणि महिला पोलिस अंमलदार सोनाली गुलाबराव हिंगे (वय ३५) यांचा समावेश आहे. या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या ते फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

या प्रकरणात अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी बडतर्फीचे आदेश जारी केले आहेत. याबाबतची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या महाविद्यालयातील प्राचार्यांविरोधात अल्पवयीन विद्यार्थिनीला तक्रार अर्ज देण्यास भाग पाडण्यात आले होते. त्यानंतर या तक्रारीच्या आधारे संबंधित प्राचार्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून ७ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली.

 

दरम्यान, अल्पवयीन मुलीला प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेत संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर प्राथमिक चौकशीत संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी ५५ वर्षीय प्राचार्यांच्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा नोंद होताच तिन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले होते. विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी तिघांवर बडतर्फीची अंतिम कारवाई करण्यात आली.

 

Local ad 1