पुणे : महापालिका निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. एकीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेने ३५ ते ४० जागांची मागणी केली आहे, तर महाविकास आघाडीत नव्याने सहभागी होण्याच्या चर्चेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा द्यायच्या, हा मुद्दाही वादाचा ठरण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (pune municipal election seat sharing mahayuti mva prashant jagtap resignation)
भाजपच्या विकास मॉडेलवर घरातूनच घणाघात ; सुरेश प्रभूंचा भाजपला घरचा आहेर !
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. मात्र, अद्याप महायुतीतील भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांच्यात जागावाटपावर पुढील चर्चा झालेली नाही. शिंदे गटाने ३५ ते ४० जागांची मागणी करणारा प्रस्ताव दिला असला, तरी त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.
भाजपकडून शिवसेनेला केवळ दहा जागा दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, भाजपकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव मिळालेला नसल्याचे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. दहा जागांवर समाधान न झाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी मांडल्याने महायुतीतील जागावाटप कितपत वादग्रस्त ठरेल, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीत प्राथमिक स्वरूपात जागावाटपाचे सूत्र ठरले असले, तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे हे सूत्र सध्या रखडले आहे. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, तर आधी ठरलेले जागावाटप पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला पुन्हा एकदा बैठक घेऊन नव्याने निर्णय घ्यावा लागणार आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी महाविकास आघाडीत “मोठ्या भावाची भूमिका आम्ही निभावणार असून, आम्हाला किमान ७० जागा मिळाव्यात,” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यातच मनसे आणि शिवसेना युती झाल्याने आघाडीत आणखी एक घटक पक्ष आल्यामुळे जागावाटपाचे गणित अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.
प्रशांत जगताप यांचा राजीनामा
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यास विरोध करणारे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात होते आणि त्यांच्याशी चर्चा देखील झाली होती. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या बाजूने कल दर्शवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, बुधवारी जगताप यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.

