IIIT Pune । आयआयआयटी पुणेला मेइटीकडून राष्ट्रीय संशोधन निधी ; पीएचडी संशोधनाला बळ

विश्वेश्वरय्या पीएचडी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सहभाग

IIIT Pune पुणे : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे (आयआयआयटी पुणे) यांना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून (मेइटी) राष्ट्रीय संशोधन निधी प्राप्त झाला आहे. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनमार्फत जारी करण्यात आलेल्या अंमलबजावणी आदेशानुसार, आयआयआयटी पुणे यांचा इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटीसाठीच्या विश्वेश्वरय्या पीएचडी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सहभाग निश्चित झाला आहे.

 

 

Pune Fire Safety Inspection : अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर? पुण्यात २९५ आस्थापनांची धडक तपासणी

 

 

इलेक्ट्रॉनिक सिस्टिम डिझाइन अँड मॅन्युफॅक्चरिंग (ईएसडीएम) तसेच आयटी/आयटीईएस क्षेत्रातील डॉक्टरेट संशोधन क्षमता वाढविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. याअंतर्गत संशोधकांना दरमहा शिष्यवृत्ती, वार्षिक संशोधन आकस्मिक निधी, भाड्याच्या निवासासाठी परतावा तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवास सहाय्य दिले जाते.

 

याशिवाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित संशोधन संस्थांसोबत सहकार्याला प्रोत्साहन देण्यात येते. त्यामुळे आयआयआयटी पुण्याची संशोधन क्षमता वाढण्याबरोबरच सक्षम संशोधन प्रतिभा संस्थेकडे आकर्षित होण्यास मदत होणार आहे.

 

 

सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि डिजिटल पायाभूत सुविधांशी संशोधनाची सांगड

या उपक्रमांतर्गत होणारे संशोधन भारताच्या सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाकांक्षेशी जोडले जाणार आहे. तसेच ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’सारख्या उपक्रमांतर्गत तांत्रिक स्वयंपूर्णतेच्या उद्दिष्टांना संशोधनाच्या माध्यमातून हातभार लागणार आहे.या निधीमुळे देशातील संशोधनासाठी पात्र मनुष्यबळाची संख्या वाढण्यासही मदत होईल. त्याचा फायदा शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्रातील संशोधन व विकास विभाग तसेच सरकारी संशोधन प्रयोगशाळांना होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतील संशोधकांना भारतातच प्रगत संशोधनाच्या संधी उपलब्ध होण्यास यामुळे चालना मिळणार आहे.

 

अर्ज प्रक्रिया संकेतस्थळावर

आयआयआयटी पुणे यांनी योजनेअंतर्गत पात्रता निकष, संशोधनाची विशेषीकरणाची क्षेत्रे आणि अर्ज प्रक्रियेची माहिती आपल्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

 

 

Local ad 1