Pune Fire Safety Inspection : अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर? पुण्यात २९५ आस्थापनांची धडक तपासणी

पीजी, हॉटेलपासून रुग्णालयांपर्यंत अग्निशमन दलाची धडक कारवाई

 

 

पुणे : शहरात आगीच्या दुर्घटना घडण्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने अग्निसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. पीजी, हॉटेल, क्लासेस, शाळा-महाविद्यालये, रुग्णालये, भंगार गोडाऊन यांसह विविध आस्थापनांची धडक तपासणी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल २९५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. (Pune Fire Department Safety Inspection Pg Hostels Hospitals)

 

 

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत विशेषतः पीजी आणि विद्यार्थी राहत असलेल्या ठिकाणांसह रुग्णालयांमधील बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या आस्थापनांवर केवळ नोटीस देऊन थांबण्याऐवजी गरजेनुसार कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

 

मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने यांनी स्वतः या मोहिमेवर लक्ष ठेवले आहे. अग्निशमन मुख्यालयात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर तपासणीला आणखी वेग देण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पीजी, हॉटेलपासून शाळांपर्यंत तपासणी
अग्निशमन दलाने केलेल्या तपासणीत १६९ पीजी व हॉटेल्स, ३३ क्लासेस, २९ शाळा व महाविद्यालये, २७ रुग्णालये, १७ भंगार मालाची गोडाऊन, दोन हॉटेल्स, एक फिटनेस जिम, एक शासकीय इमारत आणि १६ अन्य आस्थापनांचा समावेश आहे. तपासणी दरम्यान अग्निसुरक्षेच्या नियमांमध्ये त्रुटी आढळलेल्या आस्थापनांना त्या दूर करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत आवश्यक उपाययोजना न केल्यास संबंधित आस्थापनांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

तपासणी आता सातत्याने
आगीची दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील आस्थापनांमध्ये अग्निशमन यंत्रणा, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि नियमांचे पालन यांची तपासणी करण्यात येत आहे. अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा अग्निशमन दलाने दिला आहे.महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार ही तपासणी मोहीम पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने यांनी सांगितले.

 

  • तपासणी करण्यात आलेली प्रमुख आस्थापणे
    १६९ – पीजी आणि हॉटेल्स
    ३३ – क्लासेस
    २९ – शाळा व महाविद्यालये
    २७ – रुग्णालये
    १७ – भंगार माल गोडाऊन
    ०२ – हॉटेल्स
    ०१ – फिटनेस जिम
    ०१ – शासकीय इमारत
    १६ – इतर आस्थापणे

 

 

 

 

Local ad 1