महापौर निवडणुकीत ट्विस्ट ! भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिरंगी लढत !
भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिरंगी लढत शक्य
पुणे. महापालिका निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपने मंगळवारी महापौर आणि उपमहापौर पदासाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, त्याचवेळी काँग्रेसने विरोधाची भूमिका कायम ठेवत दोन्ही पदांसाठी उमेदवार दिले, तर राज्यातील महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी रिंगणात उतरत निवडणुकीत मोठा ‘ट्विस्ट’ निर्माण केला आहे. त्यामुळे आता महापौर आणि उपमहापौर पदांसाठी तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. (pune municipal corporation mayor election bjp congress ncp triangular fight)
महापालिका निवडणुकीत भाजपने तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत पुन्हा सत्तेवर झेंडा रोवला. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. भाजपकडून महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे, तर उपमहापौरपदासाठी भाजप – रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) चे परशुराम वाडेकर यांची निवड करण्यात आली. दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.
केंद्र आणि राज्यातील भूमिकेप्रमाणेच काँग्रेसने महापालिकेतही विरोधी भूमिका कायम ठेवत महापौरपदासाठी अश्विनी लांडगे आणि उपमहापौरपदासाठी साहिल केदारी यांची नावे जाहीर केली. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी अधिकृत घोषणा केल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस महापौर-उपमहापौर निवडणुकीत उमेदवार देणार नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी “राष्ट्रवादी काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत” असा पूर्वीचा आरोप पुन्हा माध्यमांसमोर मांडला.
यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अॅड. निलेश निकम, शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि आमदार चेतन तुपे यांच्या बैठकीनंतर पक्षाने अचानक निर्णय बदलला. वरिष्ठांशी चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत महापौरपदासाठी शीतल सावंत आणि उपमहापौरपदासाठी दत्ता बहिरट यांची उमेदवारी जाहीर केली. दोन्ही उमेदवारांनी तत्काळ अर्ज दाखल केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत लढणार का?
महापौर आणि उपमहापौर पदांसाठीचे मतदान सोमवारी (९ तारखेला) होणार आहे. मतदानाच्या दिवशी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार की माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

