...

मालमत्ता कर थकवणाऱ्यांना पुणे महापालिकेचा दणका ! ५८ ठिकाणी जप्ती कारवाई

 

पुणे : थकीत मिळकतकर वसुली साठी पुणे महानगरपालिकेने (PMC) आक्रमक भूमिका घेत विशेष जप्ती मोहीम सुरू केली आहे. मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरातील तब्बल ५८ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. संबंधित मालमत्तांना जप्ती नोटिसा बजावून त्या प्रत्यक्षात सील करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

 

महानगरपालिका कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कर थकबाकी प्रलंबित असल्याने महसूल वाढीसाठी वसुली यंत्रणा अधिक सक्रिय करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रकरणे, दुबार मूल्यांकनाशी संबंधित मुद्दे तसेच मोबाईल टॉवर वादातील मालमत्ता वगळता सुमारे ५,५०० कोटी रुपयांची थकबाकी अद्याप वसूल होणे बाकी असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 

मोठ्या थकबाकीदारांवर मनपाचे लक्ष

कर संकलन विभागाने प्रभागनिहाय थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. वारंवार नोटिसा देऊनही कर न भरणाऱ्या मिळकतदारांवर थेट जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. निर्धारित वसुली उद्दिष्ट गाठण्यासाठी येत्या काळात ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

 

यंदा वसुलीत वाढ, तरीही मोठी थकबाकी कायम

चालू आर्थिक वर्षात मिळकतकर वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. आजअखेर मनपा तिजोरीत २६०४ कोटी रुपये जमा झाले असून, गतवर्षी याच कालावधीत २००७ कोटी रुपये वसूल झाले होते. म्हणजेच यंदा सुमारे ६०० कोटी रुपयांची अधिक वसुली झाल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. मात्र प्रचंड थकबाकी लक्षात घेता वसुलीची गती कायम ठेवणे आवश्यक असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

 

 

नागरिकांना मनपाचे आवाहन

जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकीत कर तातडीने भरावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. स्वयंस्फूर्तीने कर भरणाऱ्या मिळकतदारांना प्रशासनाकडून सहकार्य केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. शहराच्या विकासकामांसाठी मिळकतकर हा प्रमुख महसुली स्रोत असल्याने कर भरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला. जप्ती मोहिमेमुळे येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणावर कारवाया होण्याची शक्यता असून, थकबाकीदारांमध्ये या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

Local ad 1