medicine shops closed on 20 may pune पुणे, 18 मे : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 20 मे 2026 रोजी औषध दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्याचा आगाऊ साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाचे सहआयुक्त (औषधे) गि. दि. हुकरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
कचरा माफियांसाठी पुणे घाणीत ? सभागृहात विरोधकांचा गंभीर आरोप !
या बंदमुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र, शासकीय रुग्णालये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच काही निवडक मेडिकल स्टोअर्स सुरू राहतील. पुणे जिल्ह्यातील MedPlus, Apollo Pharmacy, Wellness Forever , हॉस्पिटल संलग्न मेडिकल स्टोअर्स आणि जनरिक औषध दुकाने नियमित सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
औषध दुकानदारांना औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत परवाने देण्यात आले असून, रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे बंदच्या काळात औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच सर्व केमिस्ट बांधवांनी या बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहनही सहआयुक्त गि. दि. हुकरे यांनी केले आहे. रुग्णांना औषधे उपलब्ध न झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने कळविले आहे.

