कचरा माफियांसाठी पुणे घाणीत ? सभागृहात विरोधकांचा गंभीर आरोप !

१५० टन क्षमतेचे प्रकल्प बंद असल्याचे प्रशासनाची कबुली

 

Pune Garbage Issue। पुणे : केशवनगर येथील कचऱ्यावर प्रक्रिया करणारे सुमारे १५० टन क्षमतेचे दोन प्रकल्प मागील काही दिवसांपासून बंद असल्याने पुण्यात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुसरीकडे ७५० टन क्षमतेचा रामटेकडी येथील पूना बायो एनर्जी प्रकल्पही केवळ १०० मेट्रिक टन क्षमतेने सुरू असल्याने शहरात कचरा साचत असल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे.

 

शहरातील कचऱ्याचे वाढते प्रमाण आणि प्रक्रिया प्रकल्प बंद असल्याने अतिरिक्त ३०० ते ४०० टन कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. बंद असलेले प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, तोपर्यंत सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये अतिरिक्त कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे कोथरूड परिसरात सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते अॅड. निलेश निकम यांच्यासह वासंती जाधव, दत्ता बहिरट, महेश वाबळे, योगेश मुळीक, सुरेखा कवडे, कोमल नवले आणि अश्विनी लांडगे यांनीही प्रशासनावर टीका करत बंद प्रकल्पांकडे लक्ष वेधले.

 

नगरसेवक अरविंद शिंदे आणि प्रशांत जगताप यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे टेंडर ठरावीक ठेकेदाराला देण्यासाठी शहरात कृत्रिम कचरा समस्या निर्माण केल्याचा गंभीर आरोप केला. “कचरा माफियांना फायदा व्हावा यासाठी जाणूनबुजून कचरा साठवला जात आहे,” असा आरोप त्यांनी सभागृहात केला.

 

सर्वसाधारण सभेनंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर राम यांनी सांगितले की, केशवनगर येथील साईराम आणि नेफ्रा कंपनीचे सुमारे १५० टन क्षमतेचे दोन प्रकल्प क्षमता वाढ व यांत्रिक बिघाडामुळे बंद आहेत.

 

रामटेकडी येथील ७५० टन क्षमतेच्या पूना बायो एनर्जी प्रकल्पात काही महिन्यांपासून २०० टनांवर सुरू असलेले प्रक्रिया काम आता १०० टनांवर आले आहे. तसेच सूस येथील नोबल कंपनीचा २०० टन क्षमतेचा ओल्या कचऱ्यापासून इंधन निर्मिती प्रकल्पही केवळ ४० टन क्षमतेने सुरू आहे.

 

सध्या शहरात दररोज सुमारे ११०० टन ओला कचरा निर्माण होतो. त्यापैकी फक्त ४०० टन कचऱ्यावर प्रक्रिया होत असून उर्वरित ७०० टन कचरा शेतीसाठी दिला जातो. पूना बायो एनर्जी प्रकल्प लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

 

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी सांगितले की, सातत्याने होत असलेल्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनांमुळे काही प्रकल्पांतील प्रक्रिया कामात अडथळे निर्माण होत आहेत. बंद प्रकल्प लवकर सुरू करून शहरातील कचरा समस्या नियंत्रणात आणण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

Local ad 1