...

“पुण्यात उत्पादन शुल्क विभागाला हायकोर्टाचा दणका ! 

2BHK क्लबवरील सील हटवण्याचे आदेश”

पुणे, पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कथित मनमानी कारवाईला उच्च न्यायालयाने चपराक दिली आहे. शहरातील नामांकित “2BHK डायनर अँड की क्लब”चा मद्यपरवाना निलंबित करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने स्थगित करत, क्लबवरील सील तात्काळ हटवून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. (pune excise high court 2bhk club seal removed)

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी पुण्यातील एकूण आठ पबवर नियमभंग आणि वेळेनंतर पब सुरू ठेवून मद्यविक्री केल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी फक्त 2BHK डायनर अँड की क्लबवरच कारवाई करत, त्यांचा मद्यपरवाना १५ दिवसांसाठी निलंबित करून पब सील करण्यात आला होता.

विशेष म्हणजे, त्या कारवाईत समाविष्ट असलेल्या इतर सात पबांवर कोणतीही पुढील कारवाई झाली नव्हती. त्यामुळे “काही पबांना अभय दिले जातेय का?” असा सवाल उपस्थित होत होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर अधिकच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या कारवाईविरोधात क्लबचे ब्रँड ओनर डॉ. हेरंब शेळके यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रल्हाद परांजपे यांनी युक्तिवाद करत सांगितले की, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई एकतर्फी, मनमानी आणि अधिकारांचा गैरवापर करणारी आहे. न्यायालयाने ही बाब गांभीर्याने घेत १५ दिवसांसाठी लावण्यात आलेल्या मद्यपरवाना निलंबनाच्या आदेशाला स्थगिती दिली असून, त्यामुळे 2BHK डायनर अँड की क्लब पुन्हा तात्काळ सुरू होणार आहे.

या निर्णयातून “कायदा सर्वांसाठी समान आहे आणि कोणतीही सरकारी यंत्रणा कायद्यापेक्षा मोठी नाही” हा स्पष्ट संदेश मिळाला आहे. हा निकाल केवळ एका आस्थापनापुरता मर्यादित न राहता, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जबाबदारी, पारदर्शकता आणि अधिकारांच्या मर्यादांवरही भाष्य करणारा ठरला आहे. या प्रकरणात न्याय मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना डॉ. हेरंब शेळके  यांनी हा निर्णय म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा विजय असल्याचे म्हटले आहे.

Local ad 1