प्रशांत जगताप कोणत्या पक्षात जाणार? उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा ?
पुणे | प्रतिनिधी
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी दिवसभर जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्रशांत जगताप यांचे फोनवरून बोलणे झाल्याची माहिती समोर आल्याने, आता काॅग्रेसमध्ये की ठाकरे गटात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेदरम्यान, प्रशांत जगताप यांनी आज सायंकाळी ५ वाजता आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे mhtimes.in शी बोलताना सांगितले. त्यामुळे पुण्याच्या राजकारणात आज मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. (prashant jagtap party entry uddhav thackeray phone call pune politics)
पुण्यात जागावाटपाने पेटले राजकारण ; महायुती–मविआत अंतर्गत संघर्ष !
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असताना प्रशांत जगताप हे शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले होते. मात्र, सध्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी गटांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला. (त्यांची अधिकृत घोषणा झालेली नाही) पुणे महापालिकेत अजित पवार यांच्यासोबत न जाण्याची भूमिका जगताप यांनी मांडली होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी आघाडीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी शहराध्यक्ष आणि सक्रिय सदस्य पदाचा राजीनामा दिला होता.
यानंतर जगताप कोणत्या पक्षात जाणार, याबाबत चर्चांना उधाण आले. त्यांनी ज्या विचारधारेसाठी पक्ष सोडला, ती विचारधारा काँग्रेसशी जवळची असल्याचे सांगितले जात होते. काँग्रेस भाजपविरोधात ठाम भूमिका घेत असल्यामुळे जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. याच पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा झाली. मात्र, त्या चर्चेचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
दरम्यान, रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रशांत जगताप यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आल्याने, आता जगताप काँग्रेसमध्ये जाणार की शिवसेना (ठाकरे गट) मध्ये प्रवेश करणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

