परभणी : मुख्यालयी न राहता शासकीय घरभाडे भत्ता (HRA) घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार असून, अशा कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले आहेत. तसेच तलाठी, ग्रामसेवक व आरोग्य सेवकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यास राहणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (parbhani hra band nirdesh district collector sanjaysingh chavan)
परभणी तालुक्यातील काही तलाठी व ग्रामसेवक हे मुख्यालयी न राहता नियमितपणे शासकीय घरभाडे भत्ता घेत असल्याबाबत लोकशासन आंदोलन पार्टी यांच्याकडून निवेदन प्राप्त झाले होते. या निवेदनावर महसूल मंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना (DDO) तलाठी, ग्रामसेवक व आरोग्य सेवक हे प्रत्यक्षात मुख्यालयी राहत आहेत की नाही, याची खात्री करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. जे कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नसतील, त्यांना यापुढे घरभाडे भत्ता देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच यापूर्वी अदा करण्यात आलेल्या वेतन व भत्त्यांची योग्य ती पडताळणी करून नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याबाबत सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा शासन निर्णय क्रमांक घभाभ1015/प्र.क्र.1/सेवा-5, दि. 7 ऑक्टोबर 2016 तसेच ग्रामविकास विभागाच्या परिपत्रक क्रमांक पंरास 2018/प्र.क्र.488/आस्था-7, दि. 9 सप्टेंबर 2019 नुसार दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.
यापुढे घरभाडे भत्ता देताना शासन परिपत्रकानुसार घरभाडे पावती, ग्रामसभेचा ठराव घेणे बंधनकारक राहणार असून, कर्मचारी कार्यालयीन वेळेत नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तलाठी, ग्रामसेवक व आरोग्य सेवक मुख्यालयी वास्तव्यास असल्याबाबत ग्रामसभेचा ठराव घेऊन त्याची प्रत संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक नागेश लाखमवार, जिल्हा आरोग्य अधिकारी संजयकुमार पांचाळ, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते.

