पुणे : देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत लातूर येथील RCC क्लासेसचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांना सोमवारी अटक केली. सलग तीन दिवस चौकशी केल्यानंतर सोमवारी अटकेची अधिकृत नोंद करण्यात आली.
या प्रकरणात मोटेगावकर यांची प्रथम लातूरमध्ये चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पुण्यातही सलग तीन दिवस त्यांची कसून चौकशी सुरू होती. चौकशीदरम्यान CBIच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे NEET पेपरफुटी प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी CBIने RCC क्लासेसच्या कार्यालयावर छापा टाकून विविध कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले होते. मात्र, त्यावेळी मोटेगावकर यांना ताब्यात घेण्यात आले नव्हते. रविवारी उशिरापर्यंत ही त्यांची चौकशी सुरू होती.
दरम्यान, NEET परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर एका पालकाने तक्रार केली होती. संबंधित शिकवणी वर्गातून तब्बल ४२ प्रश्न NEET परीक्षेत आल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला होता. या तक्रारीनंतर स्थानिक पोलिसांनी चौकशी सुरू केली असतानाच CBIचे पथक लातूरमध्ये दाखल झाले.
शनिवारी CBIकडून एका शिकवणी वर्ग चालकाची चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्या दिवशी मोटेगावकर यांनी आपण नियमित विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा दावा केला होता. सोमवारी सकाळपासून त्यांची चौकशी अधिक तीव्र करण्यात आली आणि अखेर दुपारी अटकेची कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात आधीच अटकेत असलेले लातूरचे प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि मोटेगावकर हे दोघेही रसायनशास्त्र विषय शिकवत होते. त्यामुळे दोघांमधील संबंध आणि पेपरफुटी प्रकरणातील संभाव्य लिंक याचा शोध CBI घेत असल्याची माहिती आहे.
लातूर पॅटर्नच्या यशस्वी मॉडेलचे प्रतिनिधित्व करणाऱ्या RCC क्लासेसचे नाव या प्रकरणात समोर आल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक आणि ‘लातूर पॅटर्न’चे ब्रँडिंग करणाऱ्या या संस्थेच्या प्रमुखावर कारवाई झाल्याने लातूर पॅटर्नच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मोटेगावकर यांच्या अटकेनंतर आता चौकशीतून आणखी कोणाची नावे समोर येणार, याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

