...

पुराच्या पाण्यापासून बचावासाठी पुनर्वसन करा ; अन्यथा उपोषण करु गावकऱ्यांचा इशारा

कंधार : मानार धरणाखालील कौठा गावात दरवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी शिरत असल्याने गावकऱ्यांचे जीवन विस्कळीत होत आहे. ढगफुटी स्वरूपाचा पाऊस झाल्यावर गाव पूर्णपणे वेढले जाते आणि गावकऱ्यांना गाव सोडावे लागते. त्यामुळे गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात 280 नागरिकांच्या सह्यांसह लेखी निवेदन कंधारचे उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे यांना देण्यात आले.  

 

 

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट | अवैध रेती उपसा प्रकरणी 1 कोटींचा मुद्देमाल जप्त

 

1983 साली झालेल्या पुरानंतर 1986 मध्ये कौठा गावाचे अंशतः पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी दिलेल्या जागेचे अचूक वाटप झाले नाही. काहींना राऊतखेड फाटा तर काहींना जनता हायस्कूल भागात जागा दाखवली गेली. अनेकांना जागाच मिळाली नाही. लोकसंख्या वाढल्यामुळे आता प्रत्येकाला हक्काची जागा, तसेच पुनर्वसन भागात स्मशानभूमीची सोय करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी शासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, लवकर निर्णय न झाल्यास कंधार तहसील कार्यालयासमोर उपोषण केले जाईल.

 

निवेदनावर सही करणारे प्रमुख नागरिक भुजंग देशमुख, पत्रकार राजेश पावडे, विलास वाघमारे, वसंत मटके, शिवराज बसवेश्वर मंगनाळे, मोहन कांबळे, बाबाराव पिल्लेवाड, शंकर स्वामी, पप्पु हात्ते आदी.

 

दरवर्षी पुराचे पाणी गावात शिरत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने तातडीने पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा. अन्यथा कंधार तहसील कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा भुजंग देशमुख यांनी दिला.

 

Local ad 1