पुणे : पुणे महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या म्हणजेच १५ हजार ६६९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला बुधवारी (दि. २४) सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केलेल्या या अंदाजपत्रकावर तब्बल १२ तास खडाजंगी चर्चा झाली. विशेष म्हणजे, सादर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बजेट मंजूर होण्याची ही महापालिकेच्या इतिहासातील दुर्मिळ घटना ठरली आहे. (pune pmc budget 2026 approved 15 thousand crore marathon discussion)
पुणे महापालिका बजेट २०२६ : आरोग्य तपासणी निधीत भेदभाव, अरविंद शिंदेंचा भाजपवर आरोप
सभेच्या सुरुवातीला सत्ताधारी भाजप सदस्यांनी या अंदाजपत्रकाचे स्वागत केले. “हे बजेट केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास प्रकल्पांना गती देणारे असून यात पुणेकरांसाठी अनेक नावीन्यपूर्ण योजना आहेत,” असा दावा भाजपने केला. मात्र, विरोधकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. “उत्पन्नाचे ठोस स्रोत नसताना केवळ १५ हजार कोटींचा आकडा फुगवून पुणेकरांची दिशाभूल केली जात आहे,” अशी टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी केली.
अर्थसंकल्पातील निधी वाटपावरून विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी आरोप केला की, “सत्ताधारी आपल्याच प्रभागांना झुकते माप देत असून विरोधी पक्षाच्या प्रभागांना डावलले जात आहे.” राष्ट्रवादीच्या सदस्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक वाहतूक (PMPML) या क्षेत्रांमधील त्रुटींकडे लक्ष वेधले, तर काँग्रेसने भाजपला आर्थिक आकडेवारीवरून धारेवर धरले.
बहुमताच्या जोरावर मंजुरी
विरोधकांनी मांडलेले अनेक मुद्दे आणि केलेली टीका यानंतरही, महापालिकेत असलेल्या भाजपच्या स्पष्ट बहुमतामुळे हे १५ हजार ६६९ कोटींचे अंदाजपत्रक अखेर मंजूर करण्यात आले. या अर्थसंकल्पामुळे पुण्याच्या पायाभूत सुविधांना वेग मिळणार की पुणेकर केवळ आकड्यांच्या जाळ्यात अडकणार, हे येणारा काळच ठरवेल.

