Kirloskar High School SSC Result 2026 । पुणे, किर्लोस्कर हायस्कूलने यंदाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) दहावी परीक्षेत १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हा उल्लेखनीय यशाचा टप्पा गाठण्यात आला आहे.
यंदाच्या निकालात शाळेने अनेक उल्लेखनीय कामगिरी नोंदवल्या आहेत. गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये दोन विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत विशेष यश संपादन केले. तसेच १३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले असून, २१ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे. शाळेतील विद्यार्थिनी संचिता जामदाडे आणि शरयू पाटील यांनी १०० टक्के गुण मिळवत शाळेच्या गुणवंत परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या यशामुळे शाळा, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सन १९३६ मध्ये लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी स्थापन केलेल्या किर्लोस्कर हायस्कूलने गेल्या अनेक दशकांपासून शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला आहे. शाळेत शैक्षणिक उपक्रमांसोबतच क्रीडा, पर्यावरण संवर्धन आणि विविध सहशालेय उपक्रमांनाही प्रोत्साहन दिले जाते. SSC आणि HSC परीक्षांमध्ये सातत्याने १०० टक्के निकालाची परंपरा जपत किर्लोस्कर हायस्कूल विद्यार्थ्यांना आत्मविश्वासपूर्ण, जबाबदार आणि भविष्यासाठी सक्षम नागरिक म्हणून घडविण्याचे कार्य करत आहे.

