अशोक विद्यालयाचा बारावी निकाल ९९.३९ टक्के; गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम
सलग १२ वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा, विविध शाखांतील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
पुणे : महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या बारावी परीक्षेत ९९.३९ टक्के निकालाची भक्कम नोंद करत शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. सातत्यपूर्ण उत्कृष्ट निकालासाठी ओळखल्या जाणाऱ्या संस्थेने सलग १२ वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा जपत शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
या यशामागे प्राचार्य यू. के. भोसले, कनिष्ठ महाविद्यालय विभागाच्या रेखा दराडे, मनीषा मोलावणे आणि सर्व शिक्षकवृंद यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि नियोजनबद्ध अभ्यास यांचा मोठा वाटा असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
यंदाच्या निकालात विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केली. विज्ञान शाखेत कौशल पायगुडे याने ९३.५० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. समित देवरे (८८.३३ टक्के) द्वितीय, तर कार्तिकी तापकीर (८७.८३ टक्के) हिने तृतीय क्रमांक पटकावला.
वाणिज्य शाखेत समृद्धी गायकवाड हिने ८७.१७ टक्के गुणांसह प्रथम, तर गायत्री बजाज हिने ८६.३३ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. कला शाखेत अर्णव मोहोळ याने ८५.६७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवत संस्थेच्या यशात भर घातली.
संस्थेचे संचालक व खजिनदार प्रथमेश आबनावे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, उत्कृष्ट निकाल ही केवळ आकडेवारी नसून शिक्षकांचे समर्पण, विद्यार्थ्यांची जिद्द आणि संस्थेची गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीची बांधिलकी यांचे फलित आहे.
संस्थेचे मानद अध्यक्ष मोहन जोशी, सचिव प्रसाद आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, संचालक गौरव आबनावे आणि प्रजोत आबनावे यांनी यशस्वी विद्यार्थी, प्राचार्य आणि शिक्षकवृंद यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अशोक विद्यालयाने यंदाही उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत शिक्षण क्षेत्रातील विश्वासार्ह ओळख अधिक भक्कम केली आहे.

