Bhimashankar Temple Closed। भीमाशंकरला जाणार असाल तर ही माहिती महत्त्वाची; मंदिर तीन महिने बंद
Bhimashankar Temple Closed पुणे | दि. २७ (जिमाका) राज्यातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानने ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.मात्र, महाशिवरात्रीचा कालावधी (१२ ते १८ फेब्रुवारी २०२६) वगळण्यात आला असून, या कालावधीत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले राहणार आहे.
भाजपची १०० उमेदवारांची यादी तयार; बंडखोरी टाळण्यासाठी ‘वेट अँड वॉच’ धोरण
राज्य शासनाने श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. या आराखड्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याची अंमलबजावणी करताना प्रत्यक्ष बांधकामाच्या काळात भाविकांची सुरक्षितता अबाधित राखणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर २३ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन, देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार आणि भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत सर्वानुमते मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रशांत जगताप कोणत्या पक्षात जाणार? उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा ?
सन २०२७ मध्ये नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. त्याआधी प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभ २०२५ च्या अनुभवाच्या आधारे, कुंभमेळ्याच्या काळात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक पायाभूत सुविधा, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था, सभामंडप तसेच गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. कामाचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेता, भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करत नियोजित वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी मंदिर परिसर भाविकांसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नित्य पूजा सुरूच राहणार
मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री भीमाशंकर यांची नित्य पूजाअर्चा, अभिषेक व धार्मिक विधी परंपरेनुसार आणि नियोजित वेळेत सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
थेट दर्शन बंद
या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश अथवा प्रत्यक्ष दर्शन सेवा उपलब्ध राहणार नाही.
प्रवेशावर निर्बंध
बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी तसेच भीमाशंकर ग्रामस्थ वगळता कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे आवाहन
“श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, भाविक व स्थानिक नागरिकांनी प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे.”
❓ प्रश्न–उत्तर (FAQ)
प्रश्न 1 : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर कधीपासून बंद राहणार आहे?
➡️ ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.
प्रश्न 2 : महाशिवरात्रीच्या काळात मंदिर खुले राहणार का?
➡️ होय. १२ ते १८ फेब्रुवारी २०२६ या महाशिवरात्री कालावधीत मंदिर दर्शनासाठी खुले राहील.
प्रश्न 3 : मंदिर बंद ठेवण्याचे मुख्य कारण काय आहे?
➡️ सभामंडप व पायरी मार्गाचे बांधकाम, सुरक्षितता आणि विशेष विकास आराखड्याची अंमलबजावणी.
प्रश्न 4 : मंदिर बंद असताना पूजा-अर्चा सुरू राहणार का?
➡️ होय. नित्य पूजा, अभिषेक व धार्मिक विधी नियमित सुरू राहतील.
प्रश्न 5 : या काळात मंदिर परिसरात कोणाला प्रवेश असेल?
➡️ केवळ अधिकृत कर्मचारी, बांधकाम यंत्रणा आणि भीमाशंकर ग्रामस्थांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

