Maharashtra HSC Result 2026 : सलग चौथ्या वर्षी बारावीचा निकाल घसरला ; दिड लाख विद्यार्थी नापास ; काय आहे कारण जाणून घ्या..
Maharashtra HSC Result 2026 पुणे, शहर प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. मागील वर्षी फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल ९१.८८ टक्के होता. त्याच्या तुलनेत यंदा निकालात २.०९ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून निकालाचा टक्का घसरत आहे, याविषयी राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांना विचारले असता, ते म्हणाले, काॅपीमुक्त परिक्षा घेण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, याची प्रभावी अंमल बाजवणीसाठी महसूल, पोलिस आणि शिक्षण विभाग समन्वयाने काम करत आहे, त्याचेच फलित म्हणून निकालात घसरण होत आहे. यावेळी पत्रकार परिषदेत शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, बालभारती संचालक अनुराधा ओक, राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, आदी परीक्षा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे
यंदाच्या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम तसेच आयटीआय शाखांसाठी एकूण १४ लाख ४४ हजार ७१३ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख ३३ हजार ५८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. यापैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सुमारे १ लाख ४६ हजार २७२ मुले नापास झाली आहेत
खाजगी विद्यार्थी म्हणून एकूण ३७ हजार ५५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३६ हजार ९४१ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यामधील २९ हजार ६३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचा निकाल ८०.२१ टक्के लागला आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभागाने ९४.१४ टक्के निकालासह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के असून. तो सर्वांत कमी ठरला आहे.
२६ विषयांचा निकाल शंभर टक्के
राज्यातील एकूण १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला असून, अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. यंदाच्या निकालात घसरण झाली असली तरी मुलींची चमक कायम राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
शाखानिहाय निकाल 2026
* विज्ञान – ९६.४४%
* कला – ७८.०२%
* वाणिज्य – ८७.०३%
* व्यवसाय अभ्यासक्रम – ८२.७४%
* आयटीआय – ८१.७८%
* एकूण – ८९.७९%
विभागनिहाय निकाल
* पुणे – ९१.२५%
* नागपूर – ८८.६७%
* छत्रपती संभाजीनगर – ८८.६८%
* मुंबई – ९०.०८%
* कोल्हापूर – ८९.९७%
* अमरावती – ९०.९२%
* नाशिक – ९०.७२%
* लातूर – ८४.१४%
* कोकण – ९४.१४%

