Pune ACB Trap : पुणे, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केलेल्या सापळा कारवाईने शनिवारी पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडवून दिली. एकाप्रकरणात २८ लाख रुपयांची लाच घेताना एका महिला अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीला एसीबीने रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे, सहाय्यक पोलिस निरीक्षकावरून प्रमोशनने पोलिस निरीक्षक म्हणून बढती मिळाल्यानंतर शहर पोलिस दलातून (रिलीव्ह) सोडण्यात आल्यानंतर ही लाच घेताना पकडण्यात आले आहे. (pune acb trap woman police officer caught taking 28 lakh bribe)
वैशाली तोटेवार (वय ४५) असे या महिला पोलिस अधिकाऱ्यांचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
वैशाली तोटेवार शहर पोलिस दलात सहाय्यक निरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांची नेमणूक आर्थिक गुन्हे शाखा येथे होती. दरम्यान, नुकतेच त्यांचे गृहविभागाने सहाय्यक निरीक्षकावरून पोलिस निरीक्षक अशी बढती (प्रमोशन) केली होती. बढतीकरून त्यांची पुण्यावरून मुंबई लोहमार्ग येथे बदली केली होती. बदलीनंतर पुणे पोलिसांनी त्यांना शुक्रवारी रिलीव्ह (कार्यमुक्त) केले होते. मात्र, नव्या पदावर रुजू होण्यापूर्वीच महिला सहायक पोलिस निरीक्षकांनी खासगी व्यक्ती मार्फत बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉन्नाड जवळ २८ लाख रुपयांची लाच घेताना लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. या घटनेनंतर या महिला पोलिस अधिकार्यांची पोलीस आयुक्तालयातील रुमचा सर्च घेतला जात आहे. वैशाली यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना त्यांच्याकडे ८ ते ९ तक्रार अर्ज तपासासाठी दिले होते. त्यांचा तपास सुरु असतानाच त्यांना पोलिस निरीक्षक म्हणून बढती मिळाली होती. मात्र, बदली झालेली असताना व तिथे रुजू होण्यापुर्वी त्यांनी एका प्रकरणात ३० लाख रुपयांच्या लाचेचे प्रकरण घडवून आणले. यामधील २ लाख रुपये घेतले होते. उर्वरित २८ लाख रुपये घेताना त्यांना एसीबीने पकडले. दरम्यान,तोटेवाड यांच्या घराची आणि पोलिस आय़ुक्तालयतील कॅबिनची झडती घेतली जात आहे.

