पुणे : ‘महापालिकेची सत्ता ज्यांच्याकडे होती, त्यांनी गेल्या सात वर्षांत शहर विकासासाठी कोणतेही ठोस काम केले नाही. पुण्याच्या विकासाचा आलेख ढासळला असून आता महापालिकेतील “कारभारी त्रिकूट” बदलण्याची वेळ आली आहे,’ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाचा सविस्तर लेखाजोखा मांडला. ‘कारभारी त्रिकूट’ बदलण्याचे आवाहन करताना त्यांनी संबंधित नेत्यांची नावे जाणीवपूर्वक टाळली. मात्र, ‘ज्यांच्याकडे सत्तेची सूत्रे होती, त्यांच्याबाबतच मी बोलत आहे,’ अशी स्पष्ट टिप्पणी त्यांनी केली. (ajit pawar criticism on bjp pune mahanagarpalika)
पुणे महापालिकेत राजकीय भूकंप! महायुती नाही, आघाड्यांचं गणित विस्कटलं
२०१७ मध्ये पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपला एकहाती सत्ता मिळाली. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष, महापौर आणि सभागृहनेते पदांवर विविध नेत्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. मात्र, या कालावधीत शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप पवार यांनी केला.
पवार म्हणाले, ‘रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन अशा सर्वच क्षेत्रांत महापालिकेची कामगिरी निष्क्रिय ठरली आहे. पुण्याची “सांस्कृतिक शहर” ही ओळखही पुसली जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शहराचा विकास खुंटला आहे.’
पुण्यात भाजपची ‘सुरुवात जोरदार’! सनसिटी–माणिकबागमध्ये निर्विवाद विजय
ते पुढे म्हणाले, ‘मागील सत्ताधाऱ्यांनी तब्बल ७३ हजार कोटी रुपयांचा खर्च केला. मात्र, नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अपयश आले. विकास आराखड्यातील रस्ते रखडले आहेत. खड्डे दुरुस्तीवरच कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची क्षमता अपुरी असून घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.’
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तुलनेत पुण्यातील अपयश अधोरेखित करत पवार म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवडमध्ये दीर्घकाळ नियोजनबद्ध विकास झाला. पुण्यात मात्र दूरदृष्टीचा अभाव दिसून आला. उड्डाणपुलांची रचना चुकीची ठरली असून काही पूल तोडण्याची वेळ आली आहे. पुण्यातील स्थानिक नेतृत्व अपयशी, निष्क्रिय आणि नाकर्ते ठरले आहे. त्यामुळे हे “त्रिकूट” बदला आणि पुण्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सत्ता द्या,’ असे आवाहन त्यांनी केले.

