...

पुण्यात भाजपची ‘सुरुवात जोरदार’! सनसिटी–माणिकबागमध्ये निर्विवाद विजय

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) आणखी एक मोठे यश मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी–माणिकबाग येथून भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप हे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, हे दोघेही सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत. (pune municipal election 2026 bjp unopposed victory suncity manikbag)

निवडणूक प्रक्रियेदरम्यान मंजुषा नागपुरे यांच्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले होते. काही नेत्यांकडून त्यांची उमेदवारी कापण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा होती. मात्र भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात नागपुरे आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) शिफारस मिळाल्याने अखेर त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली.

प्रभागात विरोधकांकडून उमेदवार न उभा राहिल्याने दोन्ही भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आले. या विजयामुळे सनसिटी–माणिकबाग परिसरात भाजपचा दबदबा अधिक दृढ झाल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या विश्वासामुळेच हा निर्विवाद विजय मिळाल्याची प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, भाजप कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले, आता दोन जागा बिनविरोध जिंकल्या आहेत, अजून १२३ जागा बाकी आहेत. भाजपचा १२५ जागा जिंकण्याचा संकल्प १६ जानेवारी रोजी स्पष्ट होईल.”

मोहोळ यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की, पराभव दिसू लागल्याने विरोधी पक्षांचे उमेदवार माघार घेत आहेत. महाविकास आघाडीला उमेदवार शोधण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, शिंदेंच्या शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर जागावाटपावर एकमत न झाल्याने पुण्यात मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपने आदिती बाबर यांना पुरस्कृत उमेदवारी जाहीर केली आहे. यापूर्वी अधिकृत उमेदवार पूजा मोरे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थितीत बाबर यांना उमेदवारीचे पत्र देण्यात आले.

भाजपचा महापालिका निवडणूक प्रचार  शुक्रवारपासून सुरू होत असून, सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त समताभूमी येथून प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, सर्व आमदार व उमेदवार उपस्थित राहणार आहेत.

 

❓ प्रश्न-उत्तर (FAQ)

 

प्रश्न 1 : सनसिटी–माणिकबाग प्रभागातून कोण बिनविरोध निवडून आले?
👉 भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप बिनविरोध निवडून आले आहेत.प्रश्न 2 : हे दोन्ही नगरसेवक कितव्यांदा निवडून आले आहेत?
👉 दोघेही सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत.

प्रश्न 3 : भाजपचा 125 जागांचा दावा कोणी केला?
👉 केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी 125 जागा जिंकण्याचा दावा केला आहे.

प्रश्न 4 : प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपचा उमेदवार कोण आहे?
👉 प्रभाग क्रमांक 2 मधून आदिती बाबर यांना भाजपने पुरस्कृत उमेदवारी दिली आहे.

प्रश्न 5 : भाजपचा प्रचार कुठून सुरू होत आहे?
👉 सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त समताभूमी येथून भाजपचा प्रचार सुरू होत आहे.

Local ad 1