पुणे महापालिकेत राजकीय भूकंप! महायुती नाही, आघाड्यांचं गणित विस्कटलं
अर्ज माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट; बहुतेक प्रभागांत चौरंगी लढतीची शक्यता
Pune Municipal Election 2026 पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत महायुती प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचे अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळावरच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, बहुतेक प्रभागांत चौरंगी लढती होण्याची चिन्हे दिसत आहेत. (pune municipal election 2026 mahayuti bjp shiv sena swbala)
पुण्यात भाजपची ‘सुरुवात जोरदार’! सनसिटी–माणिकबागमध्ये निर्विवाद विजय
भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र लढतील, अशी अपेक्षा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत होती. मात्र अर्ज माघारीच्या दिवशी शिंदेंच्या शिवसेनेकडून एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. शिंदेंच्या शिवसेनेने शंभराहून अधिक जागांवर उमेदवार उभे केल्याने दोन्ही पक्षांत ‘मैत्रीपूर्ण’ पण थेट लढत होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने सर्वच्या सर्व १६५ जागांवर उमेदवार उभे केल्यामुळे पक्षाने सुरुवातीपासूनच स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता, हे आता स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाचा घोळ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये जागावाटपाचा तिढा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सुटला नाही. त्यामुळे दोन्ही गटांकडून इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यात आले. जागावाटपाच्या सूत्रानुसार शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुलनेने अधिक एबी फॉर्म देण्यात आल्याची चर्चा होती. अर्ज माघारीनंतरच्या स्थितीनुसार शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ४४ उमेदवार रिंगणात असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे १२१ उमेदवार निवडणूक लढवत असल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी?
महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख घटक असलेला शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीचे गणित बिघडले आहे. त्याचा थेट परिणाम जागावाटप आणि उमेदवारीच्या एबी फॉर्म प्रक्रियेवर झाला. सध्या महाविकास आघाडीत ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस हे दोनच पक्ष उरले आहेत. ठाकरे गटासोबत आलेल्या मनसेने ४४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक २३ मध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासमोर मनसेचे प्रल्हाद गवळी यांचे थेट आव्हान असणार आहे. काही प्रभागांत मनसे आणि काँग्रेसचे उमेदवारही एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मनसेकडून केवळ एका ठिकाणी उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेने ७८ जागांवर उमेदवार उभे केल्याने त्यांच्या उमेदवारांचीही काँग्रेसच्या उमेदवारांशी थेट लढत होण्याची चिन्हे आहेत.

