PMPL Bus CCTV : पीएमपीच्या सर्व बसमध्ये बसणार सीसीटीव्ही कॅमेरे ; रोहन सुरवसे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमधील विनयभंग, चोरी आणि अपघातांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पीएमपी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. (pmpml cctv cameras in all buses pune passenger safety decision)

 

रोहन सुरवसे-पाटील यांनी एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांना लेखी निवेदन देत सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत उर्वरित बसमध्येही ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला.

 

सध्या पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे ३० ते ३५ टक्के बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याचे सुरवसे-पाटील यांनी नमूद केले. त्यामुळे बसमधील चोरी, महिलांशी गैरवर्तन किंवा इतर गुन्हेगारी घटनांमध्ये आरोपींची ओळख पटविणे आणि पुरावे मिळविणे कठीण जात होते. विशेषतः गर्दीच्या वेळेत घडणाऱ्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात होती.

 

पीएमपीच्या वातानुकूलित तसेच नव्याने दाखल झालेल्या बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा आधीपासूनच उपलब्ध आहे. आता उर्वरित जुन्या बसमध्येही टप्प्याटप्प्याने कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याशिवाय, बसमधील सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण आणि देखरेख करण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण यंत्रणा उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

 

या निर्णयामुळे बसमधील विनयभंग, चोरी आणि इतर गैरप्रकारांवर आळा बसण्यास मदत होईल, तसेच प्रवाशांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित होईल, असा विश्वास रोहन सुरवसे-पाटील यांनी व्यक्त केला.

Local ad 1