Pune-Shirur Elevated Corridor : पुणे-शिरूर एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाला अखेर गती
53 किमी लांबीचा प्रकल्प 4 वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य
Pune-Shirur Elevated Corridor : पुणे-शिरूर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पुणे-शिरूर एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (MSIDC) हा प्रकल्प वेलस्पन एंटरप्रायझेस (Welspun Enterprises) कंपनीला मंजूर केला आहे. या प्रकल्पासाठी 30 एप्रिल 2026 रोजी लेटर ऑफ अवॉर्ड (LoA) जारी करण्यात आले. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीला 4 वर्षांची मुदत देण्यात आली आहे.
व्हिडओ : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘कनेक्टिंग लिंक’चे उद्घाटन
पुणे-शिरूर एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी वेलस्पन एंटरप्रायझेस ही सर्वात कमी दराची (L1) बोलीदार कंपनी ठरली होती. मात्र, कंपनीने दिलेली प्रारंभिक बोली ही MSIDC च्या अंदाजित खर्चापेक्षा मोठ्या फरकाने अधिक असल्याने मागील काही महिन्यांपासून आर्थिक वाटाघाटी सुरू होत्या.
MSIDC ने या प्रकल्पासाठी 6,000 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च निश्चित केला होता. तर वेलस्पन एंटरप्रायझेसने सुरुवातीला 8,745 कोटी रुपयांची बोली सादर केली होती. दीर्घ चर्चेनंतर कंपनीने आपली बोली कमी करत 7,300 कोटी रुपयांवर प्रकल्प स्वीकारला आहे. हा एलिव्हेटेड कॉरिडॉर 53 किलोमीटर लांबीचा असणार असून पुणे ते शिरूर दरम्यानच्या वाहतूक समस्येवर मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः पुणे-अहमदनगर महामार्गावरील सततची वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रवासातील वाढलेला वेळ लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते शिरूर प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

