Pune Grand Challenge Tour 2026 । सोमवारी पुण्यात बाहेर पडताय ? आधी ही बातमी वाचा… ८ प्रमुख भागात वाहतूक बंद
४० देशांतील १७१ सायकलिस्ट; ४० देशांत लाईव्ह प्रक्षेपण
पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ या स्पर्धेत ४० देशांतील तब्बल १७१ व्यावसायिक सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा ४० देशांमध्ये थेट (लाईव्ह) प्रसारित** केली जाणार असून, पुण्याच्या जागतिक ओळखीला यामुळे मोठी चालना मिळणार आहे. देशात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा आयोजित होत असून, शासन, प्रशासन आणि पोलिस यंत्रणांनी यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे सहपोलिस आयुक्त शर्मा यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरात उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील विविध देशांतून येणाऱ्या सायकलपटूंच्या स्वागतासाठी शहरभर भव्य व आकर्षक सजावट करण्यात आली असून, नागरिकांमध्ये या स्पर्धेबाबत विशेष उत्सुकता दिसून येत आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि प्रवेशद्वारांवर रंगीबेरंगी रांगोळ्या, आधुनिक कलात्मक डिझाइन तसेच सायकलिंगचा संदेश देणारी दृश्यात्मक सजावट उभारण्यात आली आहे. काही ठिकाणी विशेष प्रकाशयोजनेअंतर्गत भव्य सायकल आकृती उभारण्यात आल्या असून, त्या पुण्याच्या क्रीडा व सांस्कृतिक ओळखीला नवा आयाम देत आहेत.
पुणे कॅम्प, औंध, बाणेर, हिंजवडी तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रमुख मार्गांवर रस्ते सौंदर्यीकरण, रंगकाम व सजावटीची कामे अंतिम टप्प्यात असून, ही सजावट पाहण्यासाठी नागरिक थांबून कौतुक व्यक्त करत आहेत. या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने पुणे शहर पुन्हा एकदा जागतिक पातळीवर अधोरेखित होणार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. ही स्पर्धा केवळ क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित न राहता पर्यटन, संस्कृती आणि शहराच्या जागतिक प्रतिमेला चालना देणारी ठरणार आहे. पुणेकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या आयोजनाला विशेष वैभव प्राप्त झाले असून, ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ हे आयोजन शहराच्या इतिहासात लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्पर्धेदरम्यान प्रमुख रस्ते पूर्णपणे बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्यवर्ती आणि पश्चिम पुण्यातील शाळा व महाविद्यालयांना सोमवारी पूर्णवेळ सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी जारी केले आहेत.
खालील क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत :
* छत्रपती शिवाजीनगर – घोले रोड
* विश्रामबागवाडा – कसबा
* ढोले पाटील रोड
* भवानी पेठ
* औंध – बाणेर
* कोथरूड – बावधन
* सिंहगड रोड
* वारजे – कर्वेनगर
कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात
पुणे ग्रँड टूरच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यामध्ये ३ अपर पोलिस आयुक्त, १० पोलिस उपायुक्त, १५ सहाय्यक पोलिस आयुक्त, ५० पोलिस निरीक्षक, २०० सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, १६०० पोलिस कर्मचारी यांच्यासह बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि शीघ्र कृती दल (QRT) तैनात असणार आहे.
FC रोड, JM रोडसह अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्ग जाहीर
स्पर्धेदरम्यान FC रोड, JM रोड, गणेशखिंड रोड आणि त्यांना जोडणारे सर्व उपरस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील. नागरिकांनी पोलिसांनी जाहीर केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच विनाकारण या भागात येणे टाळावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्र. पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ कधी होणार आहे?
उ. ही स्पर्धा १९ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.
प्र. कोणते रस्ते बंद राहणार आहेत?
उ. FC रोड, JM रोड, गणेशखिंड रोड आणि त्यांना जोडणारे उपरस्ते सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहतील.
प्र. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी आहे का?
उ. होय, मध्य व पश्चिम पुण्यातील संबंधित क्षेत्रीय कार्यालयांतील शाळा व महाविद्यालये सोमवारी बंद राहतील.
प्र. या स्पर्धेत किती देशांतील सायकलिस्ट सहभागी आहेत?
उ. ४० देशांतील १७१ सायकलिस्ट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहेत.
प्र. नागरिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत का?
उ. होय, पुणे पोलिसांनी विविध चौकांसाठी पर्यायी वाहतूक मार्ग जाहीर केले आहेत.

