ससूनमध्ये विद्यार्थ्यांसाठी मानसिक आधार केंद्र; ‘छात्र मानस कक्ष’मुळे वाढतोय आत्मविश्वास

 

पुणे : विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील मनोविकृतीशास्त्र विभागांतर्गत सुरू करण्यात आलेला ‘छात्र मानस कक्ष’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी विश्वासार्ह आणि सुरक्षित समुपदेशन केंद्र म्हणून पुढे येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे असल्याची जाणीव ठेवून हा कक्ष सुरू करण्यात आला. (student mental health student psyche cell bj medical college pune)

 

माहिती द्या आणि बक्षीस मिळवा ! गर्भलिंग निदान थांबवण्यासाठी सरकारची खबरी योजना

 

विभागप्रमुख डॉ. निशिकांत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशक वर्षाराणी मराठे आणि लहू राठोड हे विद्यार्थ्यांना संवेदनशीलता, व्यावसायिकता आणि पूर्ण गोपनीयतेच्या तत्त्वावर मानसोपचार समुपदेशन देत आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातील ताण-तणाव, न बोललेले प्रश्न आणि भावनिक संघर्ष समजून घेत त्यांना सकारात्मक दृष्टिकोन देण्याचे कार्य या कक्षामार्फत केले जाते.

 

स्थापनेपासून आतापर्यंत १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी समुपदेशन सेवा घेतली असून एकूण ३२३ समुपदेशन सत्रे यशस्वीरीत्या पार पडली आहेत. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढणे, अभ्यासातील एकाग्रता सुधारणे, ताण कमी होणे आणि भावनिक स्थैर्य निर्माण होणे असे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

 

 

पुणे–सातारा महामार्गावरील दुभाजकांची बेकायदेशीर तोडफोड; दोषींवर गुन्हे दाखल करा – रोहन सुरवसे

 

छात्र मानस कक्षामार्फत विद्यार्थ्यांसाठी ताण व्यवस्थापन कार्यशाळा, मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रम, आत्महत्याविरोधी दिनानिमित्त विशेष उपक्रम, माइंडफुलनेस व रिलॅक्सेशन सत्रे तसेच संवादात्मक चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांमुळे मानसिक आरोग्याबाबत असलेला संकोच कमी होत असून मदत घेण्याची सकारात्मक संस्कृती विकसित होत आहे. “निरोगी मन म्हणजेच यशस्वी शिक्षण” या ब्रीदवाक्याने प्रेरित हा उपक्रम विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा संदेश देतो, मदत मागणे ही कमजोरी नसून ती स्वतःकडे घेतलेली जबाबदारी आहे.

 

विभागप्रमुख डॉ. निशिकांत थोरात म्हणाले की, “सध्याच्या काळात वैद्यकीय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. काही वेळेस मानसिक ताण जाणवू शकतो. अशा वेळी ‘छात्र मानस कक्ष’ विद्यार्थ्यांसाठी आधार बनू शकतो. विद्यार्थ्यांनी आपली गरज ओळखून वेळीच या कक्षाशी संपर्क साधावा.” दरम्यान, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून ते अभ्यासाबरोबरच इतर क्षेत्रांमध्येही अधिक सक्षम बनतील, असा विश्वास इंटर्न प्रणव गजानन रुद्रवार यांनी व्यक्त केला. महाविद्यालय प्रशासनाने सुरू केलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.

Local ad 1