पुणे, दि. १० मार्च : पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज ते खंबाटकी घाट पायथा या दरम्यान अनेक ठिकाणी महामार्गावरील दुभाजक बेकायदेशीररित्या तोडून अनधिकृत जोडरस्ते तयार करण्यात आल्याने अपघातांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित दुभाजकांची तातडीने दुरुस्ती करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम तसेच पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांना निवेदन देण्यात आले आहे. (pune satara highway divider damage demand action rohan surwase patil)
माहिती द्या आणि बक्षीस मिळवा ! गर्भलिंग निदान थांबवण्यासाठी सरकारची खबरी योजना
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कात्रज ते खंबाटकी घाट पायथा या मार्गावर काही हॉटेल तसेच व्यावसायिक आस्थापनांकडून महामार्गाच्या दुभाजकांना तोडून थेट प्रवेशमार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे सेवा रस्त्यावरून येणारी वाहने अचानक महामार्गावर प्रवेश करत असून, महामार्गावरील वेगवान वाहतुकीमुळे अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी दुभाजक तोडण्यात आले आहेत, त्या सर्व ठिकाणांची तातडीने पाहणी करून दुभाजकांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.
‘माझे पुणे, माझे बजेट’ उपक्रमात सहभागी व्हा ; नागरिकांच्या सूचनांवरून ठरणार विकासकामे
तसेच महामार्गावरील दुभाजक बेकायदेशीररित्या तोडून अनधिकृत जोडरस्ते तयार करणाऱ्या संबंधित व्यक्ती, हॉटेल चालक किंवा व्यावसायिक आस्थापनांविरुद्ध चौकशी करून संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता अंकित यादव यांनी या निवेदनाची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

