...

नेत्यांच्या लक्झरी कार्स विरुद्ध रुग्णसेवा ! पुण्यातील या उमेदवाराचं प्रतिज्ञापत्र व्हायरल !

 

पुणे | प्रतिनिधी

महानगरपालिका निवडणुकांच्या काळात उमेदवारांच्या आलिशान गाड्या, ताफे आणि झगमगाटाची चर्चा हमखास रंगते. पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांच्या कोट्यवधींच्या वाहनांची माहिती समोर येत असताना, प्रभाग क्रमांक २५ मधील भाजप उमेदवार राघवेंद्र उर्फ बाप्पु मानकर यांचे प्रतिज्ञापत्र मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे.

 

 

बाप्पु मानकर यांच्या नावावर कोणतीही आलिशान चारचाकी नसून, त्यांच्या मालकीचे एकमेव चारचाकी वाहन म्हणजे रुग्णवाहिका आहे. उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही रुग्णवाहिका त्यांच्या २४ तास सुरू असलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गरजू नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत आहे.

 

राघवेंद्र मानकर हे भाजपाच्यावतीने प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसरातून निवडणूक लढवत आहेत. नागरिकांच्या आपत्कालीन गरजांसाठी उपलब्ध असलेली ही रुग्णवाहिका अनेक वेळा जीव वाचवणारी ठरल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. चारचाकी वाहनाबरोबरच त्यांच्या नावावर एक साधी दुचाकी आहे. दैनंदिन कामकाज, मतदार भेटी आणि परिसरातील फेरफटका यासाठी ते प्रामुख्याने दुचाकीचाच वापर करतात. उमेदवारांच्या महागड्या गाड्यांच्या राजकारणात हा साधेपणा मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

याबाबत बोलताना बाप्पु मानकर म्हणाले, “गुढीपाडव्याला वाहन खरेदी करण्याची परंपरा आहे. २०२३ साली आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका खरेदी केली. तीच माझ्या मालकीची एकमेव चारचाकी आहे. रुग्णसेवेसाठी तिची खरी गरज होती. एक दुचाकी आहे आणि शक्य तिथे त्यावरच फिरतो. त्यामुळे लोक थेट भेटतात, त्यांचे प्रश्न समजतात. लांबच्या प्रवासासाठी मित्रांच्या वाहनांची मदत घेतो. यापुढेही गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागरिकांच्या सेवेसाठीच वाहन खरेदी करण्याचा मानस आहे.” निवडणुकीच्या धामधुमीत सेवा आणि साधेपणाचा हा दृष्टिकोन मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा निर्माण करत आहे.

Local ad 1