पुणे : महापालिकेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने बेरोजगारांची फसवणूक करण्याच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे महापालिकेच्या कंत्राटी तसेच कायमस्वरूपी नोकरभरतीसंदर्भातील प्रत्येक आदेशावर ‘क्यूआर कोड’ देण्यात येणार आहे. या कोडच्या माध्यमातून नागरिकांना संबंधित आदेशाची सत्यता थेट महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर पडताळता येणार आहे. येत्या ५ जूनपासून या नव्या प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजीत नायर यांनी दिली. (pune municipal corporation qr code recruitment order system)
महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे तयार करून बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेचे बोधचिन्ह, अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि अधिकृत स्वरूपातील आदेशपत्रे तयार केली जात आहेत. ही कागदपत्रे इतकी खऱ्यासारखी वाटतात की त्यांची पडताळणी करण्यात प्रशासनालाही वेळ लागत असल्याचे नायर यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने प्रत्येक नोकरभरती आदेशावर स्वतंत्र क्यूआर कोड देण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित आदेशावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्या आदेशाची अधिकृत प्रत थेट महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना नियुक्तीपत्र किंवा भरती आदेश खरा की बनावट, याची त्वरित खातरजमा करता येणार आहे. याशिवाय नोकरभरती प्रक्रियेतील प्रत्येक प्रस्तावाची फाईल सुरुवातीपासूनच डिजिटल पद्धतीने ट्रॅक केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेत कायम कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. विशेषतः चतुर्थ श्रेणीतील नोकऱ्यांचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक केली जाते. नोकरीच्या आशेने अनेक जण लाखो रुपये देत असून, त्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे समोर येते. बेरोजगारीमुळे अनेक तरुण अशा टोळ्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे चित्र आहे.
दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या बनावट नोकरभरती प्रकरणात एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान जिल्हा पोलिसांनी महापालिकेकडे काही मुद्द्यांवर खुलासा मागविला होता. त्यावेळी प्रशासनाने २०१४ पासून महापालिकेत सरळसेवेची भरती बंद असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच बनावट नियुक्तीपत्रामध्ये महापालिका आयुक्त पदाचे नावही चुकीचे नमूद करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यामुळे संबंधित नियुक्तीपत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते.
आत्महत्या केलेल्या युवकाच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये १३ जणांची नावे समोर आली होती. या प्रकरणात महापालिकेचा कोणताही कर्मचारी सहभागी असल्याचे आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेच्या या नव्या निर्णयामुळे बनावट नोकरभरती आदेशांच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीला मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येऊन नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
पुणे महापालिकेच्या नोकरभरती आदेशांवर आता क्यूआर कोड देण्यात येणार असून, नागरिकांना नियुक्तीपत्रांची सत्यता ऑनलाइन पडताळता येणार आहे. बनावट नियुक्तीपत्रांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी ५ जूनपासून नवी प्रणाली लागू होणार.

