पुणे : पुणे महानगरपालिकेतील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सातव्या फेरीनंतर निकालात सतत फेरबदल होत असताना अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल बालवडकर आणि बाबुराव चांदेरे यांनी विजय मिळवला आहे. अमोल बालवडकर यांनी ६५० मतांनी, तर बाबुराव चांदेरे यांनी १४०० मतांनी विजय संपादन केला. सातव्या, आठव्या आणि नवव्या फेरीची फेरमतमोजणी करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळुंखे यांनी केवळ नवव्या फेरीचीच फेरमतमोजणी होईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. (pune municipal election prabhag 9 amol balwadkar baburao chandere wins)
LIVE | पुणे महापालिका निकाल : प्रस्थापित नेत्यांना धक्के, राजकीय गणित बदलले
विजयानंतर प्रतिक्रिया देताना अमोल बालवडकर म्हणाले, “माझा पराभव शेवटपर्यंत नेण्याचा काहींनी चंग बांधला होता. मात्र मतदारांनी मतदानरूपी आशीर्वाद देत तो डाव हाणून पाडला. ही साधी लढाई नव्हती. प्रत्येक कार्यकर्त्याने जीवाचे रान केले. अजित दादांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते, त्यामुळेच हा विजय शक्य झाला.”
ते पुढे म्हणाले की, “मी संयम ठेवला, मनाने कधीही हार मानली नाही. कुटुंबाची साथ आणि सर्वांचा पाठिंबा मिळाला. मतदारांना दिलेला शब्द पूर्ण करणार असून प्रभागातील अपूर्ण कामे पूर्ण केली जातील. विशेषतः शाळा आणि रुग्णालयाच्या कामांना प्राधान्य दिले जाईल.” यावेळी त्यांनी नाव न घेता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना टोला लगावत, “छोट्या कार्यकर्त्यांशी असे वागू नये,” असे आवाहन केले. प्रभाग क्रमांक ९ मधील या निकालामुळे पुण्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.

