...

Pune Municipal Election 2025 : महाविकास आघाडीचे सूत्र ठरले, महायुतीत मात्र खिचाताणी कायम

पुणे | प्रतिनिधी
Pune Municipal Election 2025 : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीने जागावाटपाचे सूत्र जवळपास निश्चित केले असले, तरी महायुतीमध्ये अद्यापही अंतर्गत मतभेद आणि खिचाताणी सुरू असल्याचे चित्र आहे. रविवारी महायुतीतील जागावाटप अंतिम होईल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.

 

महाविकास आघाडीची गाडी पुन्हा रुळावर

अजित पवार यांच्यासोबत न जाण्याचा ठाम निर्णय शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील संभ्रम दूर झाला. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात जागावाटपावर कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

मात्र, ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीमुळे पुण्यात मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेतले जाईल का, याबाबत संभ्रम कायम आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जागावाटपाबाबत बैठक सुरू आहे. शिवसेनेला मिळालेल्या सुमारे ५० जागांपैकी किती जागा मनसेला दिल्या जातील, हा या बैठकीतील कळीचा मुद्दा आहे. महाविकास आघाडीने मित्रपक्षांसाठी सुमारे १५ जागा राखीव ठेवल्या असून, त्यातील काही जागा मनसेला दिल्या जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

 

महायुतीत जागावाटपावरून तणाव

महायुतीतील जागावाटपाचे सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही. शिंदे गटाच्या शिवसेनेने पुण्यात किमान २५ जागांची मागणी लावून धरली आहे. मात्र, भाजपकडून १५ जागांचा प्रस्ताव दिल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेत बैठका सुरू असून, अंतर्गत मतभेदही उफाळून आले आहेत. शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना, “आमच्या चर्चा सुरू आहेत. आम्हाला किमान २५ जागा हव्यात, ही आमची भूमिका आहे,” असे स्पष्ट केले. शुक्रवारी पक्षातील गटबाजी उघडपणे समोर आली होती. एका पदाधिकाऱ्याने शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यावर आरोप केल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला. शनिवारी झालेल्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले असून, भानगिरे बैठकीतून बाहेर पडल्याचीही चर्चा आहे.

 

रविवारी महायुतीचे चित्र स्पष्ट होईल : मोहोळ

शिंदे गटाच्या शिवसेनेकडून भाजप सन्मानजनक जागा देत नसल्याचा आरोप केला जात असताना, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. “जागावाटपाबाबत आमच्यात चर्चा सुरू आहेत. दोन्ही पक्षांकडून प्रस्तावांची देवाणघेवाण सुरू असून, काही जागांवर एकमत झाले आहे. पुण्यातील जागावाटप रविवारी स्पष्ट होईल. भाजप–शिवसेना युती ही केवळ पुण्यापुरती नसून, राज्यातील सर्व महापालिकांसाठी आहे. नागपूरमध्येही प्रथमच भाजपने शिवसेनेला सोबत घेतले आहे. त्यामुळे पुण्यातही युती निश्चित झालेली दिसेल,” असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.


Pune Municipal Election: Mahavikas Aghadi Seat Sharing Final, Tension in Mahayuti

 

❓ प्रश्न–उत्तर (Q&A)

प्रश्न 1 : पुणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले आहे का?
उत्तर : होय, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात जागावाटपावर एकमत झाले असून, आघाडीचे सूत्र जवळपास निश्चित झाले आहे.

प्रश्न 2 : मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेतले जाणार का?
उत्तर : याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात जागावाटपावर चर्चा सुरू आहे.

प्रश्न 3 : महायुतीत वाद कशावरून सुरू आहे?
उत्तर : शिंदे गटाच्या शिवसेनेने २५ जागांची मागणी केली असून, भाजपने १५ जागांचा प्रस्ताव दिल्याने मतभेद निर्माण झाले आहेत.

प्रश्न 4 : महायुतीचे जागावाटप कधी अंतिम होणार?
उत्तर : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मते, रविवारी महायुतीचे जागावाटप अंतिम होईल.

 

 

Local ad 1