Pune municipal election : चार दिवसांत साडेसहा हजारांहून अधिक उमेदवारी अर्जांची विक्री
पुणे | प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्याच चार दिवसांत तब्बल ६ हजार ४३७ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाल्याने पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (Pune municipal election)
प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; पुण्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढली
विशेष म्हणजे चौथ्या दिवशी एकाच दिवसात २ हजार ६६४ अर्जांची विक्री झाली असून, ही संख्या आतापर्यंतच्या दिवसांतील सर्वाधिक आहे. यावरून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट होते.
कोणत्या विभागात किती अर्ज?
निवडणूक विभागनिहाय पाहता कोथरूड–बावधन निवडणूक अधिकारी कार्यालयातून सर्वाधिक ५६७ अर्जांची विक्री झाली आहे. तर कसबा –विश्रामबागवाडा विभागातून केवळ ८७ अर्जांची विक्री झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, अर्ज विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी आतापर्यंत केवळ ८ उमेदवारांनी प्रत्यक्ष नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. पुढील काही दिवसांत अर्ज दाखल करण्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
निवडणूक प्रक्रियेची माहिती
पुणे महानगरपालिकेत ४१ प्रभागांसाठी १६५ नगरसेवकांची निवड होणार आहे. यासाठी प्रशासनाने १५ निवडणूक अधिकारी कार्यालये सुरू केली असून, अर्ज विक्री व नामनिर्देशनाची प्रक्रिया आचारसंहितेच्या चौकटीत पारदर्शक व सुरक्षित पद्धतीने राबवली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

