...

Pooja Jadhav More Withdrawal | एक व्हिडीओ अन् सगळं संपलं अन् भाजपची जागा धोक्यात !

 

पुणे | प्रतिनिधी
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत दिलेल्या जुन्या प्रतिक्रियेवरून सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंगला सामोऱ्या गेलेल्या पूजा जाधव–मोरे यांना अखेर पुणे महापालिका निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. भाजपने फुलेनगर–नागपूर चाळ (प्रभाग क्रमांक २) येथून दिलेली त्यांची उमेदवारी अवघ्या काही दिवसांतच मागे घेण्यात आली असून, यामुळे पुण्यातील भाजपची ही जागा अडचणीत सापडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Pooja Jadhav More Withdrawal)

 

Pune Municipal Election 2025 । पुणे महापालिकेत भाजप–शिवसेना युती धूसर, अर्ज माघारीपूर्वीही तोडगा नाही

 

भारतीय जनता पक्षाने पूजा जाधव–मोरे यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या सोशल मीडियावरील जुन्या विधानांचा मुद्दा पुढे आणत पक्षातीलच काही कार्यकर्ते आणि समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ट्रोलिंगचे प्रमाण वाढत गेल्यानंतर अखेरीस भाजप नेतृत्वाने त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. आता या प्रभागात अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या भाजपच्या इच्छुक अदिती बाबर यांना पक्षाकडून पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे.

 

सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे भाजप उमेदवार पूजा मोरे–जाधव यांचा उमेदवारी अर्ज मागे

 

 

माघारीनंतर भावनिक प्रतिक्रिया

 

गुरुवारी पूजा जाधव–मोरे आणि त्यांचे पती धनंजय जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. यावेळी भावना अनावर झालेल्या पूजा जाधव–मोरे यांनी आपल्याविरोधात राबविण्यात आलेल्या सोशल मीडिया कॅम्पेनवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “माझ्या आयुष्यातील एका छोट्याशा चुकीचा खूप मोठा बाऊ करण्यात आला. माझ्याविरोधात जे षडयंत्र रचले गेले, त्याची मला प्रचंड वेदना आहे. मात्र मी लढणारी मुलगी आहे. भाजपने मला मोठ्या मनाने स्वीकारले, उमेदवारी दिली; मी पक्षाची विचारधारा समजून घेतली आहे.”

 

कोण आहेत पूजा जाधव–मोरे?

मूळच्या बीड जिल्ह्यातील पूजा जाधव यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून गेवराई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. विवाहानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून त्या आणि त्यांचे पती धनंजय जाधव सक्रिय तयारी करत होते. जुलै महिन्यात पाच हजार किलो चिकनचे मोफत वाटप केल्यानेही त्या चर्चेत आल्या होत्या.

 

भाजपमध्ये अंतर्गत नाराजी

या प्रकरणामुळे पुणे महापालिका निवडणुकीत भाजपच्या अंतर्गत समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. पूजा जाधव या सुरुवातीला प्रभाग क्रमांक १ मधून ओबीसी गटातून इच्छुक होत्या; मात्र भाजपने वंदना खांदवे यांना संधी दिल्याने त्या अस्वस्थ झाल्या. त्यानंतर प्रभाग क्रमांक २ मध्ये एबी फॉर्मच्या घाईघाईत झालेल्या निर्णयांमुळे इच्छुक अदिती बाबर यांना अपक्ष म्हणून अर्ज भरावा लागला.
आता पूजा जाधव–मोरे यांच्या माघारीनंतर भाजपकडून अदिती बाबर यांना पाठिंबा दिला जातो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या संपूर्ण घडामोडींमुळे “उमेदवार निवड प्रक्रियेत पक्ष गोंधळलेला आहे का?” असा प्रश्न उपस्थित होत असून, भाजपला पुण्यात एका जागेवर बॅकफूटवर जावे लागल्याचे चित्र आहे.

 

प्रश्न–उत्तर (FAQ)

 

प्रश्न 1: पूजा जाधव मोरे यांनी उमेदवारी का मागे घेतली?
उत्तर: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबतच्या जुन्या प्रतिक्रियेवरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झाल्याने आणि पक्षांतर्गत नाराजी वाढल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेतली.

प्रश्न 2: पूजा जाधव मोरे यांना भाजपने कुठून उमेदवारी दिली होती?
उत्तर: भाजपने त्यांना पुणे महापालिकेतील फुलेनगर–नागपूर चाळ, प्रभाग क्रमांक २ मधून अधिकृत उमेदवारी दिली होती.

प्रश्न 3: त्यांच्या माघारीनंतर भाजप कोणाला पाठिंबा देणार?
उत्तर: अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या अदिती बाबर यांना भाजपकडून पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे.

प्रश्न 4: या घटनेचा भाजपवर काय परिणाम होऊ शकतो?
उत्तर: उमेदवार निवड प्रक्रियेतील गोंधळ आणि अंतर्गत नाराजीमुळे भाजपला या प्रभागात बॅकफूटवर जावे लागण्याची शक्यता आहे.

 

Local ad 1