पुणे | प्रतिनिधी
पुणे जिल्हा प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी गंभीर घटना आज मुळशी तालुक्यात घडली. ‘पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर’ दरम्यान मुळशी –कोळवण रस्त्यावर अरुंद मार्गाचा अंदाज न आल्याने सायकलपटूंचा भीषण साखळी अपघात झाला. या घटनेत सायकलपटू एकमेकांवर आदळले, तर अनेक खेळाडू जखमी झाले. (pune grand challenge cycle tour accident mulshi)
स्पर्धा मुळशीतील कोळवण रोडवरून जात असताना रस्त्याची रुंदी अचानक कमी झाली. ताशी ६० ते ७० किमी वेगाने धावणाऱ्या सायकलपटूंना अरुंद रस्ता व तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने आघाडीच्या सायकलपटूचा ताबा सुटला. त्यानंतर मागून येणारे खेळाडू एकामागोमाग एक एकमेकांवर आदळले आणि काही क्षणांतच मोठा साखळी अपघात घडला.
या अपघातात अनेक सायकलपटू ट्रॅकवरून बाजूला फेकले गेले. प्राथमिक माहितीनुसार अनेक खेळाडूंना किरकोळ दुखापती झाल्या, तर ४ ते ५ सायकलपटूंना गंभीर दुखापत झाल्याने तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले. घटनेनंतर सुमारे १५ मिनिटे स्पर्धा थांबवण्यात आली, त्यानंतर आवश्यक उपाययोजना करून रेस पुन्हा सुरू करण्यात आली.
या घटनेमुळे स्पर्धेपूर्व नियोजन, मार्गाची पाहणी आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, आयोजक व जिल्हा प्रशासनाकडून यासंदर्भात अधिकृत खुलासा होण्याची शक्यता आहे.

