...

इंद्रायणी नदीत भीषण प्रदूषण ; काळे पाणी, पांढरा फेस अन् सुधार योजनेच्या वल्गनाच !

वारकऱ्यांच्या श्रद्धेची इंद्रायणी प्रदूषित; योजना कागदावरच

 

 

पुणे | प्रतिनिधी
मागील दोन महिन्यांपासून इंद्रायणी नदीतील प्रदूषणाची पातळी चिंताजनक स्थितीत कायम आहे. नदीपात्रात दररोज काळपट पाणी, कधी हिरवट तर कधी पांढऱ्या रंगाचा फेस पाण्यावर तरंगताना दिसत आहे. या प्रदूषणामुळे नदीत जलपर्णीची बेसुमार वाढ झाली आहे. राज्यभरातून आळंदीला येणाऱ्या वारकऱ्यांना स्नान व तीर्थासाठी शुद्ध पाणी मिळत नसल्याचे विदारक चित्र सध्या दिसून येत आहे. (indrayani river pollution alandi warakar issue)

 

पुण्यात मतविभाजनाचा फटका शिवसेना–राष्ट्रवादीला; भाजपला थेट फायदा

 

राज्य सरकारकडून इंद्रायणी नदी सुधार योजनेच्या सातत्याने घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात प्रशासन आणि राजकीय यंत्रणा उघड्या डोळ्यांनी नदीची होत असलेली दुरवस्था पाहत असल्याचा आरोप नागरिक आणि वारकरी करत आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीच्या प्रतीक्षेत इंद्रायणीचे प्रदूषण मूकपणे सहन केले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

PMC News Marathi । महापालिलकेत राजकीय पुनर्वसनाचा मार्ग मोकळा ; १० स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड

 

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा ६७१ कोटी रुपयांचा डीपीआर २४ ऑगस्ट २०२३ रोजी पर्यावरण विभागाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर २०२३ मध्ये या प्रकल्पास मान्यता देऊन तो केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाकडे (NRCD) पाठवण्यात आला. डीपीआरमधील त्रुटी दूर करून २०२४ मध्ये सुधारित अहवाल पुन्हा सादर करण्यात आला. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ६० टक्के आणि राज्य सरकारकडून ४० टक्के निधी दिला जाणार असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे.

 

पीएमआरडीए हद्दीत इंद्रायणी नदीची लांबी ८७.५० किलोमीटर असून, नदीची एकूण लांबी १०५ किलोमीटर आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून रसायनयुक्त आणि सांडपाणी मोठ्या प्रमाणावर थेट नदीपात्रात सोडले जात आहे. हे पाणी सोडणे बंद करण्याऐवजी, दररोज बिनधास्तपणे नदी प्रदूषित केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.

 

गेल्या पाच वर्षांत अनेक राज्य मंत्र्यांनी आळंदीला भेट देऊन इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याच्या घोषणा केल्या. मात्र, अद्याप निधी मंजूर झालेला नाही किंवा प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. कधी केंद्राकडे अहवाल पाठवला असल्याचे सांगितले जाते, तर कधी निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे कारण दिले जाते. मात्र, सध्याची इंद्रायणीची दुरवस्था पाहता अधिकारी आणि राजकीय मंडळी वेळकाढूपणा करत असल्याची तीव्र नाराजी आळंदीकर आणि वारकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.

 

❓ प्रश्न–उत्तर 

प्रश्न 1 : इंद्रायणी नदीत प्रदूषण किती काळापासून सुरू आहे?
उत्तर : गेल्या किमान दोन महिन्यांपासून प्रदूषणाची पातळी गंभीर आहे.

प्रश्न 2 : प्रदूषणाचे मुख्य कारण काय आहे?
उत्तर : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून सोडले जाणारे रसायनयुक्त व सांडपाणी.

प्रश्न 3 : इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची किंमत किती आहे?
उत्तर : सुमारे ६७१ कोटी रुपये.

प्रश्न 4 : निधी कोण देणार आहे?
उत्तर : केंद्र सरकार ६०% आणि राज्य सरकार ४०% निधी देणार आहे.

प्रश्न 5 : वारकऱ्यांवर याचा काय परिणाम होत आहे?
उत्तर : स्नान व तीर्थासाठी शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याने श्रद्धेला तडा जात आहे.

 

 

 

Local ad 1