...

Hanuman Pranpratishtha 2026 : शिववस्तीवर हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात, चार दिवस भक्तीचा जल्लोष

 

Hanuman Pranpratishtha 2026 : बोधेगाव : गोळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत शिववस्तीवर हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. अवघ्या ४० ते ५० घरांची वस्ती असतानाही रहिवाशांनी एकजुटीचे दर्शन घडवत मंदिर उभारणीपासून मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहणापर्यंत सर्व सोहळा मोठ्या भक्तिभावाने यशस्वीरीत्या पूर्ण केला. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना श्री काशिकेदारेश्वर येथील मठाधिपती ह.भ.प. महंत बाबागिरी महाराज यांच्या हस्ते धार्मिक विधिद्वारे मोठया भक्तिमय वातावरणात पार पडली.

 

Hanuman Pranpratishtha 2026

 

बोधेगाव – गोळेगाव रस्त्यावरील शिववस्तीवर दि. २७ ते ३० एप्रिल दरम्यान आयोजित चार दिवसीय कार्यक्रमात धार्मिक विधींचा समावेश होता. पहिल्या दिवशी हनुमान मूर्ती मिरवणूक, पुण्यहवाचन, मातृका पूजन व जलाधिवास पार पडला. त्यानंतर हरिकिर्तन व हरिनाम संकीर्तनाने वातावरण भक्तिमय झाले. दुसऱ्या दिवशी पुनःपूजा, हवन व ध्वजारोहण करण्यात आले, तर तिसऱ्या दिवशी मुख्य प्राणप्रतिष्ठापणा सोहळा विधीवत संपन्न झाला. यावेळी वस्तीवरील ३१ पती – पत्नीच्या जोड्या पूजेसाठी व होमहवनासाठी बसल्या होत्या.

 

Maharashtra HSC Result 2026 : १२ वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ; निकालाची तारीख जाहीर

 

या सोहळ्यात ह.भ.प. महंत भगवत महाराज मुंडे, ह.भ.प. महंत रामगिरी महाराज, ह.भ.प. महंत नवनाथ महाराज शास्त्री यांनी तीन दिवस हरिकीर्तनाचे पुष्प गुंफले. त्यांच्या प्रवचनांनी व कीर्तनांनी भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले. तसेच काल्याचे कीर्तन ह.भ.प. महंत बाबागिरी महाराज यांच्या सुमधुर वाणीने पूर्णत्वाला गेले. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.

 

Hanuman Pranpratishtha 2026

 

या भक्तिमय सोहळ्याला पाथर्डी- शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे, गोळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मुक्ता आंधळे तसेच पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थांनी भेटी दिल्या व सहभाग नोंदवला. हरिपाठ, पूजापाठ, होमहवन व महाप्रसाद यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला व रहिवाशांना भक्तीभावपूर्ण रसाची मेजवानीच मिळाली.

 

गावातील रथ मिरवणुकीने आणली रंगत 
सोहळ्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सकाळी शिववस्ती ते गोळेगाव अशा भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. यावेळी रथातून महंत बाबगिरी महाराज यांची रथातून भव्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीत महिला, मुली यांनी कळस धारण करत तसेच तरुणांनी पारंपरिक वेशात हिरीरीने सहभाग घेतला. तसेच डीजे च्या ‘भारत का बच्चा बच्चा अब जय जय श्रीराम बोलगा’ ‘पिंगळा बाई ग’ या व इतर गाण्यावर सर्वांनी ठेका धरला.

शिववस्तीने दाखवली एकजूट
हा सोहळा म्हणजे वस्तीवरील रहिवाशांच्या एकजुटीचे प्रतीक होते. या मंदिराला शिव वस्तीवरील रहिवाशी जनार्धन भोंडे यांनी भूमीदान केले असून सदाशिव बर्डे यांनी मूर्तीचे दान केले. तसेच शिववस्तीवरील सर्व रहिवाशांनी एकत्रितपणे निधी संकलन, नियोजन व व्यवस्थापन करून अल्पावधीत मंदिर उभारणीसह भव्य सोहळा पार पाडल्याने त्यांच्या एकजुटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. वस्तीवरील अबालवृद्धांचा उत्साहपूर्ण सहभाग व तरुणांनी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी रात्रंदिवस दिलेले योगदान उल्लेखनीय ठरले. हे वस्तीवरील रहिवाशांचे शक्तिप्रदर्शन ठरले.

 

वस्तीच्या सांस्कृतिक, धार्मिक उपक्रमासाठी हक्काचे ठिकाण
मंदिराच्या निर्मितीने शिव वस्तीला एक धार्मिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक तसेच वैचारिक उपक्रमासाठी हक्काचे स्थान मिळालं आहे. साधी बैठक घ्यायची म्हटली तरी वस्तीवर जागा नसायची. मात्र, या मंदिराची जागा म्हणजे रहिवाशांना धार्मिक, सांस्कृतिक व इतर उपक्रमासाठी हक्काचे ठिकाण झाले आहे. ही जागा मध्यवस्तीत असल्याने सर्वांना सोयीची देखील ठरणार आहे.

 

 

 

 

Local ad 1