श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

 

dagdusheth halwai ganpati trust । पुणे : देशभरातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ला राज्य सरकारतर्फे ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

 

या निर्णयामुळे पुण्यातील धार्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा आणि मंदिर परिसर विकासाला मोठी चालना मिळणार आहे. १८९३ मध्ये स्थापन झालेल्या या ट्रस्टला १३५ वर्षांहून अधिक समृद्ध परंपरा लाभली आहे. हे मंदिर केवळ भक्तीचे केंद्र नसून समाजसेवा आणि सांस्कृतिक संवर्धनासाठीही ओळखले जाते. दररोज देश-विदेशातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

 

महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात ‘कर्करोग ग्रीड’ उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

यापूर्वी मंदिराला जिल्हा नियोजन समितीकडून ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त होता. संस्थेचे सामाजिक कार्य, वाढती भाविक संख्या आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मंदिराला ‘अ’ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य केली.

 

‘अ’ वर्ग दर्जामुळे काय होणार फायदा?
‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे राज्य सरकारकडून मंदिर आणि परिसर विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत.

 

प्रस्तावित सुविधा:
* अद्ययावत दर्शन रांग व्यवस्था
* सुसज्ज वाहनतळ (पार्किंग)
* आधुनिक स्वच्छतागृहे
* भक्तनिवास सुविधा
* अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था
* परिसर सुशोभीकरण व पायाभूत सुविधा विकास

 

या निर्णयामुळे पुण्यातील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, तसेच स्थानिक रोजगार आणि पर्यटन व्यवसायालाही फायदा होण्याची शक्यता आहे.

 

आमदार हेमंत रासने यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, “१८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा मिळवणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे पहिलेच गणेशोत्सव मंडळ ठरले आहे. गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी मान्य करून लाखो गणेशभक्तांच्या भावना जपल्या.”

 

Local ad 1